लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सरळसेवा पद्धतीने पद भरती करण्याबाबत कोकण आयुक्तांशी चर्चा करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल. त्याचप्रमाणे अन्य मागण्यांसंदर्भात सविस्तर माहिती सरकारला पाठवून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि वैद्यकीय विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी दिल्यानंतर जे.जे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी रात्री संप स्थगित केला.

विविध मागण्यांसाठी जे.जे. रुग्णालय कर्मचारी संघटनेने बुधवारी सकाळीपासून बेमुदत संप पुकारला होता. या संपाची वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दखल घेत गुरूवारी सकाळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि जे.जे. रुग्णालय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेमध्ये हसन मुश्रीफ यांनी सरळसेवा पद्धतीने रिक्त पदे भरण्यासंदर्भातील बिंदुमानावली तातडीने तयार करून त्याची माहिती कोकण आयुक्तांकडे पाठवून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश देण्यात येतील, तसेच रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांचे न्यायालयीन प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले.

आणखी वाचा-मुंबई : मोटारीवर उड्डाणपुलाच्या छताचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही

तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर माहिती व त्याचे विश्लेषण करून राज्य सरकारला पाठवण्यात येईल, असे राजीव निवतकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्याचप्रमाणे रुग्णालय स्तरावरील प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील, असे आश्वासन डॉ. पल्लवी सापळे यांनी दिले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आयुक्त राजीव निवतकर यांनी मागण्या सोडवण्याबाबत दिलेल्या आश्वासनानंतर जे.जे. रुग्णालय कर्मचारी संघटनेने गुरूवारी रात्री संप मागे घेतला. संप मागे घेत तातडीने सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे रुग्णालय परिसरात राहणारे कर्मचारी रात्री ८ च्या सुमारास कामावर रूजू झाले. तर रात्रीपाळीचे बहुतांश कर्मचारी कामावर रूजू झाल्याचे जे.जे. रुग्णालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा रेणोसे यांनी सांगितले.

आणखी वाचा-अंधेरी सहार येथे मुख्य जलवाहिनी खचली, पाण्याच्या चावीचा भाग खचला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिचारिकेने मारले कर्मचाऱ्याच्या कानाखाली

संपादरम्यान एक चतुर्थश्रेणी कर्मचारी रक्त तपासणी प्रयोगशाळेमध्ये गेला होता. यावेळी प्रयोगशाळेत कार्यरत असलेल्या परिचारिकेसोबत त्याचा वाद झाला. या वादातून परिचारिकेने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारले. त्यामुळे या परिचारिकेवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली होती. या मागणीची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने या परिचारिकेचे बदली अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात केली.