भाजपा हे आपलं घर आहे आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे असं वक्तव्य नुकतंच अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारेंनी केलं. ज्यानंतर त्यांच्यावर चांगलीच टीका होते आहे. संजय राऊत यांनी तर महेश कोठारे मराठी आहेत ना? ते असंच बोलत राहिले तर तात्या विंचू येऊन त्यांना चावेल असं विधान केलं. दरम्यान महेश कोठारेंनी मी आपल्या मतावर ठाम आहे असं म्हटलं. आता महेश कोठारेंवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भलताच आरोप केला आहे. महेश कोठारेंची सून उर्मिला कोठारे ही एका अपघात प्रकरणात अडकली आहे. तिला वाचवण्यासाठीच महेश कोठारे असं बोलत आहेत असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या?
महेश कोठारे यांना लक्ष्य करताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, महेश कोठारे हे कलाकार आहेत, ही खरी गोष्ट आहे. पण त्यांच्या सुनबाई अडकल्यात एका अपघात प्रकरणात. तिला कसं वाचवायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. भाजपावर अशी मुक्ताफळं उधळल्याशिवाय ही गोष्ट साध्य होणार नाही. महाराष्ट्रात जी एक संस्कृती तयार होतोय, मी नाव नाही घेणार, मला कुठल्याही जातीचा अपमान नाही करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने संपूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं, पण त्यासोबत क्रौर्यही दाखवलं, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता महेश कोठारे आणि भाजपचे नेते काही प्रतिक्रिया देणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असेल.
उर्मिला कोठारे कारच्या अपघाताचं प्रकरण नेमकं काय?
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाला होता. ठाणे-घोडबंदर रस्त्यावर मध्यरात्री १२.५५ च्या सुमारास हा अपघात झाला होता. त्यावेळी उर्मिला कोठारे ही आपल्या मैत्रिणीला भेटून तिच्या घरी जात होती. यावेळी तिचा चालक गजानन पाल हा कार चालवत होता. कांदिवली पोईसर मेट्रो स्थानकाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. या अनियंत्रित कारने मेट्रो स्थानकाजवळ काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवले. त्यानंतर कार बॅरिकेटला जाऊन धडकली होती. या अपघातामध्ये सम्राटदास जितेंद्र या मजुराचा मृत्यू झाला होता. तर उर्मिला कोठारे ही अपघातात जखमी झाली होती. तिलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अपघाताच्यावेळी चालक गजानन पाल गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली होती. तो गाडी चालवताना दारुच्या नशेत होता का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुनेही घेतले होते. तेव्हापासून याप्रकरणात नक्की काय घडलं, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
महेश कोठारे काय म्हणाले होते?
मागाठाणे येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपावर स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले, “भाजपा म्हणजे आपले घर आहे, कारण मी स्वतः भाजपाचा भक्त आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही भक्त आहे.” यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. आता किशोरी पेडणेकर यांनीही त्यांना उत्तर दिलं आहे.
