मुंबई : सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत असून मागील ३ वर्षांत सायबर पोलिसांच्या मदत क्रमांक १९३० वर तब्बल १३ लाखांहून अधिक फसवणुकीचे फोन आले आहेत. पोलिसांनी तात्काळ दखल घेत पुढील कारवाई केल्याने फसवणुकीतील ३०० कोटी रुपयांची रक्कम गोठविण्यात यश आले आहे. याशिवाय पोलिसांनी ११ हजार सायबर भामट्यांचे फोनही ब्लॉक केले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असतो आणि बहुतांश व्यवहार ऑनलाईन करण्यात येतात. त्याचाच फायदा घेऊन सायबर भामटे नागरिकांची विविध प्रकारे फसवणूक करीत आहेत. तक्रारदार फसवणूक झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाईपर्यंत वेळ जातो आणि त्याचे आर्थिक नुकसान होते. यासाठी मुंबई गुन्हे शाखेने मदत क्रमांक १९३० सुरू केला आहे. या मदत क्रमांकावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात येत आहेत.

तीन वर्षांत फसणुकीचे १३ लाख फोन

हा मदत क्रमांक १७ मे २०२२ रोजी सुरू करण्यात आला होता. या सायबर मदत क्रमांकावर १७ मे २०२२ ते २१ ऑगस्ट २०२५ या ३ वर्षांच्या कालावधीत एकूण १३ लाख १९ हजार ४०३ फोन आले होते. यामध्ये प्रामुख्याने शेअर ट्रेडींग, गुंतवणूक, डिजिटल अरेस्ट, ऑनलाईन टास्क, ऑनलाईन शॉपिंग, कर्ज मिळवून देणे, नोकरी मिळवून देणे असे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या तक्रारींचा समावेश आहे. त्या तक्रारींपैकी सायबर फसवणुकीच्या १ लाख ३१ हजार तक्रारी एनसीआरपी पोर्टलवर (राष्ट्रीय सायबर गुन्हे) नोंदविण्यात आल्या.

तीन महिन्यांत ११३ कोटी रुपये गोठवले

या हेल्पलाईनवर नागरिकांनी तक्रार केल्यानंतर एनसीआरपी या पोर्टलवर तक्रार नोंद केली जाते. तक्रार प्राप्त होताच अधिकारी आणि अंमलदार हे संबंधित बॅंक, वॉलेट, मर्चंट इत्यादी नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पाठपुरावा करतात. नागरिकांची फसवणूक झालेली रक्कम कारवाई करून संंबंधित बॅंक खात्यांवर तातडीने गोठविण्यात येते. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदत क्रमांक सुरू झाल्यापासून विविध बॅंकांतील जवळपास ३०० कोटी रुपये गोठविण्यात आले. चालू वर्षातील १ मे ते २१ ऑगस्ट या ३ महिन्यांच्या कालावधीत ११३ कोटी ८६ लाख रुपये गोठविण्यात यश आले आहे. ही रक्कम नंतर न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित तक्रारदारांना परत करण्यात येते.

११ हजार सायबर गुन्हेगारांचे मोबाइल ब्लॉक

मागील दीड वर्षात (जानेवारी २०२४ ते जुलै २०२५) या कालावधीत पोलिसांनी सायबर भामटयांचे ११ हजार ६३ फोन ब्लॉक केले आहेत.