मुंबई: प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर व्हावा या उद्देशाने ताफ्यात विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित दुमजली बसगाड्यांची संख्या वाढविण्याकडे बेस्टचा कल आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेस्टच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या आणखी १० वातानुकूलित बसगाड्या दाखल झाल्या आहेत. या बसगाड्या कुर्ला – अंधेरी आणि आगरकर चौक (अंधेरी पूर्व) – सीप्झ टर्मिनस मार्गावर धावू लागल्या आहेत. यामुळे उपनगरांतील प्रवाशांना दिलासा मिळेल, असा विश्वास बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांसाठी वातानुकूलित विद्युत दुमजली बसगाड्या घेण्याचा निर्णय घेतला असून टप्प्याटप्प्याने या बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट होत आहेत. बेस्ट उपक्रमाने २८ नोव्हेंबर रोजी कुर्ला – वांद्रे – कुर्ला संकुल दरम्यान १० वातानुकूलित विद्युत दुमजली बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बेस्ट बसमार्ग क्रमांक ३१० वर वांद्रे बस टर्मिनस – कुर्ला (प.) बस स्थानकांदरम्यान १० बसगाड्या चालवण्यास सुरुवात केली. तर, सोमवारपासून बेस्ट बसमार्ग क्रमांक ३३२ कुर्ला बस आगार – अंधेरी (पू) आणि बेस्ट बसमार्ग क्रमांक ४१५ आगरकर चौक (अंधेरी पूर्व) – सीप्झ टर्मिनस दरम्यान या बसगाड्या धावण्यास सुरुवात झाली.
हेही वाचा… भुजबळ आणि पुतण्याविरोधातील याचिका ईडीकडून मागे; मुलगा पंकजविरोधातील याचिका मात्र कायम
मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी व्हावा यादृष्टीने बेस्ट उपक्रमाने फेब्रुवारी २०२३ पासून पर्यावरणपूरक वातानुकूलित विद्युत दुमजली बसगाड्या ताफ्यात समाविष्ट करण्यास सुरुवात केली. सध्या बेस्ट उपक्रमातर्फे ४५ वातानुकूलित विद्युत दुमजली बसगाड्या दक्षिण मुंबई आणि उपनगरांत चालवण्यात येत आहेत. या बसगाड्या पर्यावरणपूरक असून या बसगाड्यांमधून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायू प्रदूषण होत नाही. याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाइल चार्जिंगची व्यवस्था, दोन स्वयंचलित प्रवेशद्वार, सीसी टीव्ही कॅमेरे या बसगाड्यांमध्ये बसवण्यात आले आहेत, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली.