मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मोबाइल क्रमांक दुसऱ्या सीमकार्डवर सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीने एका दिवंगत खासदाराच्या पत्नीच्या मोबाइलचाही ताबा घेतल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महिलेच्या दिराने केलेल्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी आरोपी विवेक सब्रवालला नुकतीच अटक केली. आरोपी मृत्यू झालेल्या श्रीमंत व्यक्तींचा मोबाइल क्रमांका सीमस्वॅपिंगद्वारे दुसऱ्या सीमकार्डवर सुरू करून त्याद्वारे बँक खात्यातून रक्कम काढण्याचा प्रयत्न करीत होता. आरोपीविरोधात यापूर्वी मुंबई व दिल्लीमध्ये सायबर फसवणुकीचे १० गुन्हे दाखल आहेत.
विवेक सब्रवाल याला नुकतीच जुहू पोलिसांनी अटक केली होती. सध्या आरोपीला त्याप्रकरणी जामीन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपीने जुहू पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेच्याही मोबाइलचा ताबा मिळवला होता. त्याद्वारे सायबर फसवणूक करण्याचा आरोपीचा प्रयत्न होता. पण त्यापूर्वीच हा प्रकार उघड झाला. त्यामुळे त्याला बँक खात्यातील रक्कम काढता आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. दिवंगत खासदाराचा मुलगा असल्याचे भासवून आरोपीने संबंधित मोबाइल क्रमांकाची स्वतःच्या नावावर नोंदणी केली. त्यासाठी बनावट कागदपत्र, ई-मेल ॲड्रेस व दुसऱ्या मोबाइल क्रमांकाचा आरोपीने वापर केला होता. त्याला सीमस्वॅपिंग प्रकार म्हणतात. आरोपीने दिवंगत खासदाराच्या पत्नीचा मोबाइल दुसऱ्या सीमकार्डवर सुरू केल्यानंतर त्याचे सीमकार्ड बंद झाले. ही बाब दिवंगत खासदाराच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने याबाबतची माहिती दिराला दिली. महिलेचे दिर औषध कंपनीचे मालक आहेत. त्यांनी याप्रकरणी जुहू पोलिसांकडे तक्रार केली होती. जुहू पोलिसांनी याप्रकरणी ९ जुलैला गुन्हा दाखल केला होता. दिवंगत खासदार मोठ्या औषध कंपनीचे मालक होते. त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्यासाठी आरोपीने हा प्रकार केल्याचा संशय आहे. आरोपीने यापूर्वी दिवंगत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या मोबाइलचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी विवेक सब्रवालला अटक केली होती. त्यावेळी तपासात विवेक सब्रवालचा सहभाग जुहू प्रकरणातही आढळल्यामुळे पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली. त्याप्रकरणी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीविरोधात देशभरात १० सायबर गुन्हे आहेत. त्यापैकी चार गुन्हे मुंबईत व चार गुन्हे दिल्लीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बाबा सिद्दीकी यांच्या मोबइलचा ताबा घेण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुलगी डॉ. अर्शिया सिद्दीकी (३५) यांचे ‘फ्लेवर फूड व्हेंचर’ नावाचे हॉटेल आहे, तर पत्नी शेहझीन सिद्दीकी यांची ‘झियर्स बिझनेस इंडिया एलएलपी’ नावाची रिअल इस्टेट कंपनी आहे. कुटुंबियांनी बाबा सिद्दीकी यांचा मोबाइल क्रमांक सुरूच ठेवला होता. हा मोबाइल क्रमांक वरील व्यवसायाशी संलग्न ठेवण्यात आला आहे. शेहझीन सिद्दीकी यांच्या नावाने एक ई-मेल आला होता. त्यात बाबा सिद्दीकी यांच्या मोबाइल क्रमांकासाठी अधिकृत स्वाक्षरी हक्काबाबत विचारणा करण्यात आली होती. या मेलबरोबर शेहझीन सिद्दीकी यांचा आधार क्रमांक, पॅन कार्ड, वस्तू सेवा क्रमांक (जीएसटी) आणि कुटुंबाच्या कंपनीचे लेटरहेडही वापरले होते. आरोपीने मोबाइल दुसऱ्या सीमकार्डवर सुरू करून त्याद्वारे फसवणूक करण्याचा कट रचला होता. पण हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यानंतर याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी विवेक सब्रवालला दिल्लीवरून अटक केली होती.