महाड येथील दुर्घटनेतील दोन एसटी बसगाडय़ांमधील मृत १८ प्रवाशांच्या कुटुंबियाना विम्यापोटी प्रत्येकी १० लाख रुपये आणि प्रत्येकी दोन वाहक व चालकांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई किंवा एका वारसाला नोकरी दिली जाणार आहे. मात्र प्रवाशांनी आरक्षण केले नसल्याने आणि खासगी वाहनांमधील व्यक्तीही या दुर्घटनेत मरण पावल्याने एसटीतील प्रवासी नेमके कोण, हे सिध्द करणे कठीण होणार आहे. नातेवाईकांच्या माहितीवर विसंबून राहून ही भरपाई दिली जाणार आहे. मात्र खासगी वाहनांमधील मृतांच्या नातेवाईकांकडून भरपाईसाठी एसटीकडे दावा केला गेल्यास प्रशासनाची पंचाईत होणार आहे. खासगी वाहने वाहून गेल्याने जे दगावले, त्यांचा अजून थांगपत्ताच लागला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजून त्यांच्यासाठी नुकसान भरपाईच जाहीर केलेली नाही.
महाड येथील पूल कोसळल्याने जयगड-मुंबई आणि राजापूर-बोरीवली या दोन बसगाडय़ा वाहून गेल्या. दोन्ही बसगाडय़ांमधील वाहकांच्या स्वयंचलित तिकीट मशीनच्या नोंदीवरून त्यामध्ये प्रत्येकी नऊ प्रवासी होते, असे दिसून आले आहे. त्यामुळे दोन्ही गाडय़ांमधील १८ प्रवासी व प्रत्येकी दोन वाहक-चालक यांच्या कुटुंबीयांना विम्यापोटीचे प्रत्येकी १० लाख रुपये दिले जातील.
प्रत्येक तिकीटामागे एक रुपया आकारणी त्यासाठी केली जाते. त्यातून प्रवाशांना भरपाई दिली जाणार आहे. तर सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास १० लाख रुपये भरपाई किंवा एका वारसाला नोकरी अशा स्वरुपात मदत दिली जाते. त्यानुसार ही भरपाई दिली जाईल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.
प्रवाशांची ओळख पटविण्याचे आव्हान
जे प्रवासी एसटीने मुंबईला गेले, ते न पोचल्याने त्यांच्या नातेवाईकांनी एसटी प्रशासनाकडे चौकशी केली आणि त्यातून प्रवाशांची नावे मिळाली आहेत. तसेच वाहकांच्या तिकीट पंचिंगची नोंदही एसटी प्रशासनाकडे आहे. त्यानुसार दोन्ही बसगाडय़ांमध्ये १८ प्रवासी होते. मात्र या दुर्घटनेत काही खासगी गाडय़ाही वाहून गेल्याने त्यामधील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांनी एसटीतून प्रवास केल्याचा आणि भरपाईसाठी दावा केल्यास काय करायचे, हा प्रश्न प्रशासनास पडला आहे.