मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी काँग्रेसचे ११ आमदार अनुपस्थित होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नऊ आमदार वेळेत पोहोचू शकले नाहीत.

परिणामी त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही. ‘अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचा आभारी,’ असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली. राज्याचे पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांनी पक्षाच्या नेत्यांना या संदर्भात जाब विचारला आहे.

 विश्वासदर्शक ठरावावर सकाळी ११ वाजता मतदानास सुरुवात झाली. सभागृहात आमदारांची उपस्थिती राहील याची खबरदारी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने घेतली होती. विरोधी बाजूला काही बाके रिकामी होती. मतदानाला सुरुवात करण्यापूर्वी पाच मिनिटे आमदारांच्या उपस्थितीची घंटा वाजविण्यात येते. त्यानंतर दरवाजे बंद केले जातात. राष्ट्रवादीचे संग्राम जगपात आणि अण्णा बनसोडे हे दोघे मिनिटभर विलंबाने आले. काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख आदी विलंबाने पोहोचले. त्यांना बाहेर लॉबीतच थांबावे लागले.  मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच विरोधकांची मते अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तुलनेत कमी पडल्याने कोण गैरहजर आहे याचा आढावा घेण्यात आला. काँग्रेसचे नऊ आमदार वेळेत पोहोचू शकले नव्हते. दोन जण पूर्वकल्पना देऊन गैरहजर होते. राज्यातील सत्तानाटय़ात काँग्रेसमधील आमदारांचा एक गट फुटणार, अशी चर्चा सुरू झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 ठराव मंजूर होताच काँग्रेस आमदारांच्या अनुपस्थितीवरून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चिमटा काढला. अनुपस्थित राहून आम्हाला मदत केल्याबद्दल आमदारांचे आभार, या फडणवीस यांच्या वक्तव्याने काँग्रेसमध्ये आणखीनच संशय वाढला. पक्षाचे आमदार मोठय़ा प्रमाणावर मतदानाला अनुपस्थित राहिल्याबद्दल मुंबई दौऱ्यावर असलेले पक्षाचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत आमदारांकडे विचारणा केली. अशोक चव्हाण व वडेट्टीवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते उपस्थित नसल्याबद्दल पक्षात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पक्षाच्या आमदारांची आधी बैठक का आयोजित केली नाही, अशी विचारणा पाटील यांनी केली.