मुंबई : मुंबईमधील ११ हजार ८३६ घरांची फेब्रुवारीमध्ये विक्री झाली असून यामुळे मुद्रांक शुल्क वसुलीच्या रुपाने राज्य सरकारला ८६९ रुपये महसूल मिळाला आहे. जानेवारी २०२४ च्या तुलनेत फेब्रुवारी २०२४ मध्ये घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. तर मागील १२ वर्षांत फेब्रुवारी महिन्यामधील सर्वाधिक घरविक्री फेब्रुवारी २०२४ मध्ये झाली आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात १० हजार ९६७ घरांची विक्री झाली होती. राज्य सरकारला यातून ७६० कोटी रुपये महसूल मिळाला होता. तर फेब्रुवारीत ११ हजार ८३६ घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला ८६९ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत एक हजाराहून अधिक घरांची विक्री झाली आहे. राज्य सरकारला मिळालेल्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे. त्याचवेळी मागील १२ वर्षांतील फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक विक्री फेब्रुवारी २०२४ मध्ये झाली आहे.

हेही वाचा – विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली

हेही वाचा – गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित

फेब्रुवारी २०१३ मध्ये ४८४०, फेब्रुवारी २०१४ मध्ये ४८४३, फेब्रुवारी २०१५ मध्ये ४९८६, फेब्रुवारी २०१६ मध्ये ५२०८, फेब्रुवारी २०१७ मध्ये ३६६४, फेब्रुवारी २०१८ मध्ये ६६३१, फेब्रुवारी २०१९ मध्ये ५२३०, फेब्रुवारी २०२० मध्ये ५९२७, फेब्रुवारी २०२१ मध्ये १०१७२, फेब्रुवारी २०२२ मध्ये १०,३७९ तर फेब्रुवारी २०२३ मध्ये ९,६८४ घरांची विक्री झाली होती. नव्या वर्षात सुरुवातीच्या दोन महिन्यात १० हजारांहून अधिक घरांची विक्री झाली असून भविष्यात घरांच्या विक्रीत आणखी वाढ होईल, अशी आशा बांधकाम व्यवसायाला आहे.