अध्यापकांचीही ४७० पदे भरण्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची ४७० पदे भरण्याबरोबरच परिचारिकांची ११०० रिक्त पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे अतिदक्षता विभागासह बालरोग विभाग तसेच अन्य महत्त्वाच्या विभागांसाठी मोठय़ा प्रमाणात परिचारिका उपलब्ध होणार आहे.
रुग्णसेवेमध्ये डॉक्टरांबरोबर परिचारिकांचेही अनन्यसाधरण महत्त्व असते. तथापि गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालये नव्याने सुरू केली जात असताना परिचारिकांच्या भरतीबाबत ठोस निर्णय होत नव्हता. यातून वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांवर औषधोपचार करण्यापासून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी परिचारिकांअभावी रुग्णालय व्यवस्थापनाचे तसेच रुग्णांचेही मोठय़ा प्रमाणात हाल होत होते. एकीकडे राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात शासकीय तसेच खासगी व सार्वजनिक भागीदारीतून वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्याच वेळी अस्तित्वात असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मेडिकल ‘कौन्सिल ऑफ इंडिया’च्या निकषांनुसार पुरेसे अध्यापक नाहीत त्याचप्रमाणे परिचारिकांचीही संख्या अल्प असल्यामुळे या महाविद्यालयांच्या मान्यता रद्द करण्याच्या नोटिसाही स्वीकारण्याची वेळ येत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालयांमधील अध्यापक व परिचारिकांच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या निकषांपेक्षा जास्त पदे भरण्याची भूमिका घेतली. यातून सोळाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होणार असून यासाठी पहिल्या टप्प्यात अध्यापकांची ४७० पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता लक्षात घेता ‘एमसीआय’ मानकानुसार तीन रुग्णखाटांमागे एक अधिपरिचारिका तर आयसीयू, सीसीयू, एनआयसीयू, लेबर रुम आणि अपघात विभागात एका रुग्णामागे एक अधिपरिचारिकेची आवश्यकता आहे, असे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगरे यांनी सांगितले
रुग्णसेवेमध्ये कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याची भूमिका असून सर्व रिक्त पदे भरली जातील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध व्हाव्या यासाठी सुपरस्पेशालिटी डॉक्टरांची पदे विशेष मोहीम राबवून भरण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
स्पर्धा परीक्षेतून निवड
११०० पदे भरण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून निवड झालेल्या परिचारिकेला ज्या शहरामध्ये नियुक्ती दिली जाईल तेथे १० वर्षे सेवा करावी लागणार आहे. यामुळे गोंदीया वैद्यकीय महाविद्यालयात ३७५ परिचारिका उपलब्ध होणार आहे तसेच चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय २२५, कोल्हापूर ६२, सोलापूर ७८, औरंगाबाद १०४ , नागपूर ७८ तर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात १०६ परिचारिका उपलब्ध होणार आहेत.
१६ वैद्यकीय महाविद्यालयांसाठी १२ हजार परिचारिकांची आवश्यकता असून सध्या १०,५०० परिचारिका सेवेत आहेत. उर्वरित १५०० पदे भरण्याची गरज असून यापैकी ११०० पदे तात्काळ भरण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने काढले आहेत. उर्वरित ४०० पदे ही पदोन्नतीने भरली जातील – डॉ. प्रवीण शिनगरे, संचालक, वैद्यकीय शिक्षण