धवल कुलकर्णी 

कांदळवनांच्या परिसरामध्ये झालेल्या अतिक्रमणांचे निष्कासन करून आज महाराष्ट्र वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी इतर सरकारी यंत्रणांच्या सहाय्याने घाटकोपर मधल्या छेडा नगर मध्ये सुमारे दीडशेच्या आसपास अनधिकृत झोपड्या तोडल्या.

या झोपड्या कांदळवन परिसरामध्ये भराव टाकून उभारण्यात आल्या होत्या. या कारवाईमध्ये महाराष्ट्र वनखात्याच्या कांदळवन कक्षाचे कर्मचारी, महसूल विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यांनीसुद्धा सहाय्य केले.

“अतिक्रमण कांदळ वनांच्या क्षेत्रांमध्ये भराव टाकून अनधिकृतपणे करण्यात आले होते. आज आम्ही साधारणपणे दीडशेच्या आसपास झोपड्या तोडून टाकल्या आणि उद्या राहिलेल्या साधारणपणे वीस झोपड्या सुद्धा तोडू. त्यानंतर या परिसरामध्ये झोपड्या येऊ नयेत यासाठी चर खणण्यात येतील. इथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येईल जेणेकरून भविष्यामध्ये इथे अजून अतिक्रमणं उभी राहू नयेत,” अशी माहिती एका महाराष्ट्र वनखात्याच्या कांदळवन कक्षाच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांनी दिली.