मुंबई- कोल्हापूरच्या श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसराच्या १४३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकास आराखड्यास आज राज्याच्या नियोजन विभागाने मान्यती दिली. महाल्क्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याचा सुमारे १ हजार ४४५ कोटी ९७ लाख रुपये किंमतीचा प्रस्ताव १५ जुलै २०२५ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर सादर केला होता. त्यापैकी १४३ कोटी ९० लाख रुपयांच्या प्रस्तावास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली. विकास आराखड्यानुसार मंदिर दुरुस्ती व संवर्धन, किरणोत्सव मार्गातील अडथळे व अतिक्रमण निर्मूलन करण्यात येणार आहे.
या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी व कामे विहित केलेल्या कालमर्यादेत पूर्ण होण्याकरिता संनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली आराखड्याशी संबंधित सर्व अंमलबजावणी व कार्यान्वयीन यंत्रणांच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश असलेली एक जिल्हास्तरीय तांत्रिक समिती, गठीत करण्यात येणार आहे. या समितीमध्ये जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची शक्यतो प्रत्येक महिन्यात एक बैठक घेण्यात यावी. अशा बैठकीस इतर जिल्हा प्रमुख यांना आमंत्रित करण्याबाबत संनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना अधिकार देण्यात आले आहेत. ही कामे ३१ मार्च २०२८पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
विकास आराखड्यात ही कामे होणार
मंदिर परिसरात सुमारे साडेबाराशे भाविकांच्या क्षमतेचे दर्शन मंडप, शौचालय पिण्याचे पाणी, पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था, व्हिनस कॉर्नरजवळ भक्त निवास उभारण्याची योजना आहे. यामध्ये भक्तांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. बहुमजली वाहनतळ, अन्नछत्र, मंदिराभोवती पादचारी मार्ग व बिंदू चौक ते भवानी मंडपापर्यंत पादचारी मार्ग, त्याचप्रमाणे मंदिराचे जतन संवर्धन, अंतर्गत सुधारणा, दर्शन मंडप आदींचा यामध्ये समावेश आहे.