मुंबई : पर्यावरणप्रेमी संघटनांकडून आरेच्या जंगलातील काही भागात राबवलेल्या वन स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवकांनी तीन तासांत १४८ किलो कचरा गोळा केला. या कचऱ्यात ८७ किलो मद्याच्या बाटल्या होत्या.

रिवाइल्डिंग आरे टीम, ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशन यांनी ही मोहीम राबवली. बुर्हानी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक, स्क्वेअर पांडा येथील कर्मचारी असे एकूण १०० स्वयंसेवक यामध्ये सहभागी झाले होते. सर्वांनी तीन तासांत १४८ किलो कचरा गोळा केला.

संरक्षित क्षेत्रात मद्यपींचा उच्छाद
गोळा केलेल्या कचऱ्यापैकी काचेच्या मद्याच्या बाटल्या ८७ किलो, १२ किलो पिशव्या, ३० किलो कपडे, 4 किलो चपला, मल्टीलेअर प्लास्टिक पिशव्या, ६०० ग्रॅम अॅल्युमिनियम, ५ किलो इतर कचरा आणि कचऱ्यासह आलेला १० किलो मातीचा कचरा देखील बाहेर काढण्यात आला.

आरेच्या जंगलातून काढण्यात आलेल्या कचऱ्यामध्ये काचेच्या बाटल्यांसह किमान ५ किलो काचेचे तुकडे गोळा केले गेले. आरेमध्ये बेकायदेशीरपणे इतके लोक मद्यपान करत असतील, तर हे अलीकडे जाहीर केलेले ‘संरक्षित’ क्षेत्र वन्यजीव आणि माणसांसाठीही खरंच किती सुरक्षित आहे? अधिकारी आरेच्या जंगलाला मुंबईचे जंगल मानतात की फक्त ओपन बार असाही प्रश्न उपस्थित होतो. येथे ठोस उपाययोजना तयार करून सुरक्षा व्यवस्था वाढविली पाहिजे, असे ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशनचे केदार सोहोनी यांनी सांगितले.