मुंबई: कूपर रुग्णालयामध्ये तीन दिवसांमध्ये दोन रुग्णांचा उंदरांने चावा घेतल्यामुळे खडबडून जागे झालेल्या रुग्णालय प्रशासनाने के पश्चिम प्रभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून रुग्णकक्षांमध्ये रुग्णांना पकडण्याचे सापळे व गोंदफास लावले आहेत. या सापळ्यांमध्ये एका दिवसांमध्ये १५ पेक्षा जास्त उंदीर पकडण्यात आले आहेत. यामुळे रुग्णकक्ष उंदरांसाठी की रुग्णांसाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कूपर रुग्णालयामधील महिलांच्या रुग्णकक्षामध्ये रुग्णांच्या खाटावरून बिनधास्त उंदीर फिरत असल्याचे उघडकीस आल्यानंतर तीन दिवसांत दोन उंदरांनी महिला रुग्णांचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे कूपर रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांची सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त उपायुक्त विपिन शर्मा यांनी याची दखल घेत के/पश्चिम विभागातील कीटकनाशक अधिकारी यांना कूपर रुग्णालयात दररोज फेरी करून उपाययोजनांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.
कीटकनाशक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची अमलबजावणी करत संपूर्ण रुग्णालय परिसराची तपासणी करून सर्व भिंतींमध्ये, कानाकोपऱ्यांमध्ये असणारे बीळ बुजवण्यात आले आहेत. तसेच, सांडपाणी आदी वाहिन्या (पाईप्स) मध्ये उंदीर शिरू नयेत म्हणजे जाळ्या लावण्यात येत आहेत. तसेच महिला रुग्णकक्षांमध्ये उंदीर पकडण्यासाठी पिंजरे व गोंदफास लावण्यात आले. महिलांच्या रुग्णकक्षात लावण्यात आलेल्या या पिंजऱ्यामध्ये रविवारी एका दिवशी तब्बल १५ पेक्षा जास्त उंदीर पकडण्यात आले. मोठ्या प्रमाणात सापडलेल्या या उंदरांमुळे रुग्णांना हायसे वाटले असले तरी हे रुग्णकक्ष उंदरांसाठी आहे की माणसांसाठी असा प्रश्न रुग्णांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
उंदरांची समस्येबाबत चौकशी समिती
उंदीर समस्या का निर्माण झाली आणि त्यावर दीर्घकालीन उपाय काय असावेत, यासाठी प्राथमिक चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमार्फत उंदीर पुन्हा होऊ नयेत यासाठी रुग्णांचे नातेवाईक आणि भेट देणारे नागरिक यांनी नेमून दिलेल्या जागा आणि कचरापेटी वगळता इतरत्र कोठेही कचरा टाकू नये, यासाठी देखरेख यंत्रणा अधिक सक्त करण्यात आली आहे. तसेच जैववैद्यकीय कचऱ्याची दररोज वेळेवर व सहायक वैद्यकीय अधिकारीयांच्या सक्त देखरेखीखाली विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.