मुंबई : महागड्या वैद्याकीय उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या अंधेरीतील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाला भूखंड हस्तांतरण प्रकरणात शासनाने सुमारे १५० कोटींची शुल्कमाफी दिली आहे. हे प्रकरण बंद करीत असल्याचे पत्र उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी अलीकडेच ‘मालती वसंत हार्ट ट्रस्ट’ला पाठविले आहे. मात्र रुग्णालयातील काही जागेच्या वाणिज्य वापराबद्दल पावणेतीन कोटींचा दंड ठोठावून तो तात्काळ भरण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय वाणिज्य वापरापोटी दरवर्षी परवाना शुल्क भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अंधेरी पश्चिमेला मोक्याच्या ठिकाणी असलेला सुमारे १२ हजार ५० चौरस मीटर भूखंड डिसेंबर १९९७ मध्ये तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारने विख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नीतू मांडके यांच्या मालती वसंत हार्ट ट्रस्टला प्रति चौरस मीटर एक रुपया या दराने ३० वर्षांसाठी दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया केल्याबद्दल मांडके यांना सामान्यांसाठी हृदयरोग संशोधन केंद्र आणि रुग्णालय उभारण्यासाठी हा भूखंड देण्यात आला होता. परंतु रुग्णालयाचे बांधकाम अर्धवट असतानाच डॉ. मांडके यांचे निधन झाले. हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अनिल अंबानी यांच्या कंपनीने पुढाकार घेतला. त्यांनी रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण केले आणि रुग्णालयाचे नामकरण ‘कोकिळाबेन अंबानी रुग्णालय’ असे केले. मालती वसंत हार्ट ट्रस्टवरील डॉ. मांडके यांच्या पत्नी डॉ. अलका मांडके वगळता अन्य विश्वस्त बदलण्यात आले. अशा रीतीने विश्वस्त बदलणे म्हणजे भूखंडाचे हस्तांतरण असल्याचे तसेच शासनाची पूर्वपरवानगी न घेता वाणिज्य वापर होत असल्याबाबत महालेखापालांनी आक्षेप घेतला. त्यामुळे शासनाने अनर्जित रकमेपोटी ट्रस्टकडून १७६ कोटी रुपये वसूल करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

हेही वाचा >>> आचारसंहितेपूर्वी निर्णयांची लगबग; मंत्रिमंडळाची आज सकाळी पुन्हा बैठक, पाच दिवसांत हजारांपेक्षा अधिक शासकीय आदेश जारी

या पार्श्वभूमीवर तत्कालीन उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रस्टला नोटीस पाठविली. याबाबत सुनावणी होऊन हा भूखंड मालती वसंत हार्ट ट्रस्टकडून मांडके फाऊंडेशनकडे हस्तांतरित झाल्याचे स्पष्ट करीत ५८ कोटी रुपये अनर्जित रक्कम भरण्याचे आदेश २०१२ मध्ये देण्यात आले होेते. मात्र या आदेशाला विभागीय आयुक्तांकडे आव्हान देण्यात आले. विभागीय आयुक्तांनी फेरसुनावणीसाठी हे प्रकरण पुन्हा उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले. त्यानंतर तत्कालीन उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी २०१४ मध्ये उपलब्ध चटई क्षेत्रफळापेक्षा अधिक चटई क्षेत्रफळ वापरल्यामुळे शुल्क आणि दंडापोटी सुमारे १५० कोटींची अनर्जित रक्कम भरण्याचे आदेश दिले. या आदेशाला महसूलमंत्र्यांकडे आव्हान देण्यात आले.

ट्रस्टवरील विश्वस्तांची अदलाबदल हा भूखंड हस्तांतरणाचा प्रकार होत नाही, असा युक्तिवाद महसूलमंत्र्यांनी मान्य केला आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना नव्याने आदेश जारी करण्यास सांगितले. त्यानुसार अनर्जित रकमेबाबत सुनावणी बंद झाल्याचे आणि वाणिज्य वापराबाबत दंड भरण्याचे आदेश उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जारी केले आहेत. या पत्राची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे.

याबाबत कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाचे संचालक के. नारायण तसेच उपाध्यक्ष (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) श्रेणीक मेहता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. लघुसंदेशालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र उपनगर जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी त्यास दुजोरा दिला.

७,२८५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा वाणिज्य वापर

२००७ पासून रुग्णालयात ग्लोबन बेक, कुबेर कॅफे, एचडीएफसी आणि एसबीआय बँकेचे एटीएम, स्टार बक्स, गिफ्ट शॉप, मेडिकल स्टोअर, तुरखिया ऑप्टिशिअन, यास्मिन ब्युटी सलून, आइस्क्रीम शॉप, छटोरी चाट शॉप, कॅफेटेरिया स्टॉल, सबवे, फाइन डायनिंग रेस्तराँ अशा सुमारे सात हजार २८५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा वाणिज्य वापर सुुरू आहे. त्यापोटी दोन कोटी ७० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंबानी कुटुंबीय विश्वस्त…

शासनाने हा भूखंड मालती वसंत हार्ट ट्रस्टला दिला. तो मांडके फाऊंडेशनला हस्तांतरित करण्यात आला. तीन मूळ विश्वस्तांपैकी डॉ. नीतू मांडके, जोत्स्ना मांडके यांची नावे कमी करून त्याऐवजी कोकिळाबेन अंबानी, अनिल अंबानी, टीना अंबानी यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. कालांतराने के. नारायण आणि डॉ. तुषार मोतीवाला यांचीही विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.