मुंबई : भारताच्या शेजारी नेपाळमध्ये ‘जेन झी’ तरुण वर्ग रस्त्यावर उतरल्याने सरकारविरोधात दोन दिवस जी हिंसक आंदोलने सुरु आहेत, त्यामध्ये राज्यातील १५० पर्यटक अडकले आहेत. यामध्ये सर्वाधिक ६५ पर्यटक ठाणे जिल्ह्यातील असून सर्व पर्यटक सुखरुप आहेत, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १५० पर्यटकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील ६५, पुणे ५, मुंबई ६, अकोला १०, यवतमाळ १, लातूर २, कोल्हापूर जिल्ह्यातील एका पर्यटकाचा समावेश आहे. उर्वरित पर्यटकांच्या जिल्ह्यांची माहिती मिळालेली नाही. राज्यातील पर्यटक ६ टूर ऑपेटरच्या माध्यमातून नेपाळमध्ये पर्यटनाला गेले होते. नेपाळमधील विमान व रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने सर्व पर्यटकांचा हॉटेलात मुक्काम आहे. बीड जिल्ह्यातील ११ पर्यटक बसव्दारे उत्तर प्रदेशात सुखरुप पोचले आहेत.
१२ पर्यटक कैलास मानसरोवर यात्रेकरु असून सध्या ते चीन सीमेशेजारील कुरांग प्रांतात अडकले आहेत. ‘तुम्ही जिथे आहात तिथे राहा. हॉटेलबाहेर पडू नका. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा’, असे आवाहन भारतीय दूतावासाने भारतीय पर्यटकांना केले आहे. शुक्रवार पर्यंत नेपाळमधील विमान सेवा पुर्ववत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पर्यटकांना सुखरुप आणणे शक्य होणार आहे. ‘राज्यातील पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे’, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी दिली.
राज्यातील पर्यटक काठमांडू, पोखरा, पुरंग येथील हॉटेलमध्ये निवासाला असून त्यांच्याशी राज्य सरकार संपर्कात आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना मदत पुरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्य आपत्कालीन केंद्र, महाराष्ट्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून अधिकृत माध्यमांव्दारेच माहिती प्राप्त करावी व अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.