मुंबई : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी आणि नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्ववत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, नेमलेल्या अभ्यासगटाने केलेल्या शिफारशी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १० – २० – ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करावी, शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करावी, अशा विविध मागण्या राज्यातील शिक्षकांनी नुकत्याच मुंबई शहर शिक्षक विकास मंडळातर्फे आयोजित महासंमेलनात मांडल्या. या महासंमेलनाला जवळपास १६०० शिक्षक उपस्थित होते. यावेळी शिक्षकांच्या प्रत्येक समस्येला शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे वचन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळातर्फे देण्यात आले.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी आणि नंतर सेवेत रुजू झालेलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्ववत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, नेमलेल्या अभ्यासगटाने केलेल्या शिफारशी लागू करा, १०-२०-३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करावी, तांत्रिक शाळांचे सर्व पात्र शिक्षकांना सरसकट निवड वेतनश्रेणी मान्य करा, मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरावी, मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये १ नोव्हेंबर २००५ नंतर नेमणूक झालेल्या सर्व शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते सुरू करा, प्रत्येक शाळेत कला, क्रीडा व संगीत शिक्षकांची पदे पुनर्स्थापित करावी, समुपदेशकांना समुपदेशक पद देऊन पूर्वीप्रमाणे वेतनवाढ मिळावी, रात्रशाळांना पूर्ण वेळ शाळेचा दर्जा मिळावा, लिपिक, शिपाई पद पूर्ण वेळ करावे, शिक्षकांचे सेवा निवृती वेतनाचे प्रस्ताव एक महिन्याच्या आत मंजूर करण्यासंदर्भात शासन आदेश निर्गमित व्हावे, प्रशिक्षित पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी, अशा अनेक मागण्या शिक्षकांनी या महासंमेलनात मांडल्या.
शिक्षण हा देशाच्या व्यवस्थेचा मुख्य कणा असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील राहील, असे आश्वासन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले. डॉ. विशाल कडणे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक चळवळीचे काम उत्तम सुरु असून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ कौतुकास पात्र असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या प्रत्येक समस्येला शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे वचन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारणी सदस्य डॉ. विशाल कडणे यांनी दिले. तसेच प्रत्येक व्यक्तिचे वय कितीही झाले तरी तो मनामधून युवाच असतो, फक्त आपल्याला त्याच्या मनातला युवक बाहेर काढता आला पाहिजे, याच संकल्पनेतून कार्यक्रमाचे नाव युवा संमेलन ठेवण्यात आले असल्याचे डॉ विशाल कडणे यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली.
कार्यक्रमादरम्यान व्यक्तिमत्व विकास आणि अध्यात्माकडून शास्त्राकडे या विषयावर उपस्थित शिक्षकांना स्वामीनारायण समाजाचे स्वामी भक्तीप्रिय स्वामी यांनी मार्गदर्शन केले.