१७४ हेक्टर जागा ताब्यात आल्याबरोबर एमएमआरडीए सक्रीय

मुंबई…वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४, कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ आणि गायमुख ते मिरारोड मेट्रो १० मार्गिकेतील अडचणीचा बनलेला कारशेडचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या तिन्ही मार्गिकांसाठीच्या मोघरपाडा कारशेडची १७४ हेक्टर जागा मोट्या प्रतिक्षेनंतर अखेर शुक्रवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात आली आहे. ही जागा ताब्यात आल्याबरोबर एमएमआरडीएकडून कंत्राटदाराच्या माध्यमातून कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता कारशेड मार्गी लागले असून एमएमआरडीएला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईला ठाणे, मिरारोडशी मेट्रोने जोडण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो ४, ४ अ आणि मेट्रो १० मार्गिका हाती घेतल्या आहेत. मेट्रो ४ आणि ४ अचे काम वेगात सुरु असून आॅगस्टमध्ये या दोन्ही मार्गिकेतील कॅडबरी ते गायमूख अशा १०.५ किमीच्या मार्गिकेवर गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात करत ही मार्गिका डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचेही नियोजन एमएमआरडीएचे आहे. तर मेट्रो १० मार्गिकेच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.

मेट्रो ४, ४ अ चा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन असताना या मार्गिकेतील कारशेड मात्र रखडले होते. त्यामुळे कारशेड नसताना पहिला टप्पा वाहतूक सेवेत कसा दाखल होणार असा प्रश्न होता. त्यावर तोडगा म्हणून एमएमआरीएने दोन स्टॅबलिंग लाईन म्हणजेच मेट्रो गाड्यांच्या देखभालीसाठी, गाड्या सुरक्षितपणे ठेवण्यासाठीची जागा, मार्गिका तयार कण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा केव्हा कारशेड तयार होईल, तेव्हा या मार्गिकेसाठी कारशेडचा वापर करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे होते. पण आता मात्र एमएमआरडीएची मोठी अडचण अखेर दूर झाली आहे. मागील कित्येक वर्षांपासूनची मोघरपाड्याच्या जागेच्या ताब्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

मोघरपाडा येथील १७४ हेक्टर जागा कारशेडसाठी देण्यास राज्य सरकारने केव्हाच हिरवा कंदिल दिला. कागदोपत्री जागा एमएमआरडीएच्या ताब्यातही आली. मात्र काही कारणाने जागेचा प्रत्यक्ष ताबा मिळत नव्हता. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे एमएमआरडीएकडून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आणि शुक्रवारी मोघरपाड्याची जागा ताब्यात घेत जागेवर एमएमआरडीएचा फलक लावण्यात आला आहे.

जागा ताब्यात आल्याबरोबर कंत्राटदार एसईडब्ल्यू इन्फ्रा-विश्व समुद्र इंजिनियरिंग (संयुक्त) यांच्या माध्यमातून प्राथमिक कामास सुरुवात करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील सुत्रांनी दिली. आता काम सुरु झाले असून हे काम येत्या ३६ महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. दरम्यान याविषयी महानगर आयुक्त डाॅ संजय मुखर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.