महाराष्ट्राचा वक्तृत्वकलेचा वारसा जोपासणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेचे व्यासपीठ गाजवण्यासाठी राज्यभरातील तरुण वक्ते सरसावले आहेत. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आता फक्त दोन दिवस संधी आहे.

जनमानसावर गारूड करणाऱ्या, निर्भीडपणे विचार मांडणाऱ्या तरुण वक्त्यांची महाराष्ट्राला ओळख करून देण्याची परंपरा गेली पाच वर्षे ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ ही स्पर्धा पुढे नेत आहे. तरुणाईला विचार प्रवृत्त करणाऱ्या, सभोवतालच्या घटनांवर व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ देणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या यंदाच्या पर्वातही राजकीय, सामाजिक, पर्यावरण, खेळ अशा विषयांवर परखडपणे व्यक्त होण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ही स्पर्धा तीन टप्प्यांत होणार आहे. प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेले वक्ते विभागीय अंतिम फेरीत दाखल होतील. विभागीय अंतिम फेरीतील विजेत्या वक्त्यांची महाअंतिम फेरी मुंबईत रंगेल आणि त्यातून या वर्षीचा राज्यातील ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ कोण हे ठरेल.

हे महत्त्वाचे..

स्पर्धेचे अर्ज भरण्यासाठी २४ फेब्रुवारीपर्यंत मुदत असून प्राथमिक फेऱ्या २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर आपले विचार मांडण्यासाठी उत्सुक असलेला कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातील आणि १६ ते २४ या वयोगटांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.

स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे विषय

‘निर्भया आणि नंतर’

‘जंगलाच्या शोधात वाघोबा!’

‘स्वच्छ भारत : एक दिवास्वप्न’

‘ज्यांचे त्यांचे गांधी आणि सावरकर’

‘ऑलिम्पिक वर्षांत क्रिकेटची चिंता’

प्रायोजक..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ ही स्पर्धा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर अशा आठ केंद्रांवर होणार आहे. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ असून या स्पर्धेचे बँकिंग पार्टनर ‘डोबिंवली नागरी सहकारी बँक’ हे आहेत. नॉलेज पार्टनर चेतनाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च हे आहेत.