मुंबई : गेले १० दिवस षोडशोपचार पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी गणेशाला निरोप देण्यात येणार आहे. या सोहळय़ाच्या निमित्तची गर्दी लक्षात घेऊन मुंबईत २० हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
करोनामुळे दोन वर्षे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, यंदा करोना संसर्गाचे प्रमाण कमी असल्याने हा उत्सव उत्साहात साजरा झाला. विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांनी जय्यत तयारी केली आहे.
यंदा रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू राहतील, तसेच मोठय़ा संख्येने नागरिक मिरवणुकीत सहभागी होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे मिरवणूक मार्ग आणि विसर्जनस्थळी तब्बल २० हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
गिरगाव, दादर, लालबाग, परळ भागात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून गर्दीच्या ठिकाणांवर ड्रोनने नजर ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईत ३ हजार २०० अधिकारी, १५ हजार ५०० अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाच्या आठ कंपन्या, शीघ्र कृती दलाची एक कंपनी, फोर्स वनची एक कंपनी, ७५० गृहरक्षक, २५० प्रशिक्षणार्थी, त्याचबरोबर बॉम्बशोधक पथक, श्वान पथक तैनात करण्यात आली आहेत.
वाहतूक नियमनासाठी..
वाहतुकीच्या नियमनासाठी मुंबई वाहतूक पोलिसांसह सुमारे १० हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यात प्रशिक्षणार्थी पोलीस, होमगार्डचे जवान, नागरी संरक्षण दलाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक, नागरी सरंक्षण दलाचे जवान, एनएसएसचे विद्यार्थी, स्काऊट गाइडचे विद्यार्थी यांचा समावेश आहे. विसर्जनस्थळांवर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून पोलिसांबरोबरच विविध यंत्रणा, संस्था भाविकांच्या मदतीसाठी सज्ज राहणार आहेत.