पावसामुळे अनेकांची रात्र फलाटांवर, कार्यालयांत;  परतीच्या प्रवासातही सात-आठ तास खर्ची

मुसळधार पावसाचे बुधवारी पहाटेपासून सुरू झालेले तांडव सायंकाळनंतर शांत झाल्यानंतरही मुंबईकरांची रखडपट्टी गुरुवारी सकाळपर्यंत कायम होती. पावसामुळे बंद झालेली रेल्वेसेवा गुरुवारी सकाळपर्यंत सुरळीत न होऊ शकल्याने अनेकांनी रेल्वे-मेट्रो स्थानके किंवा आपल्या कार्यालयातच रात्री मुक्काम ठोकला. तर धाडस करून रेल्वे पकडणाऱ्यांना सात-आठ तासांच्या प्रवासानंतर घराचे दर्शन घडले.

सीएसएमटी स्थानकात बुधवारी रात्री प्रवाशांची तुडुंब गर्दी होती. प्रवाशांना घरी जाता यावे म्हणून पोलीस रस्त्याने जाणारे ट्रक अडवून त्यामध्ये त्यांना बसवत होते. प्रवाशांनी कोंबून भरलेल्या गाडय़ा सर्वत्रच दिसत होत्या. प्रवाशांच्या अडचणीचा फायदा घेत ओला आणि उबर कंपन्यांच्या गाडय़ांनी भाडय़ात चार-पाच पट वाढ केली. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला प्रचंड मोठा भरुदड पडला. प्रवाशांनाही जादा पैसे देण्याशिवाय पर्याय नव्हता. अनेकांना रेल्वे स्थानकातून माघारी फिरून कार्यालयात येऊन राहावे लागले. तसेच सीएसएमटी स्थानकात अडकलेल्या प्रवाशांमध्ये आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड वादावादी झाली.

लोअर परळमध्ये खासगी कार्यालयात काम करणारे अमित राजवाडे यांनी असाच अनुभव कथन केला. ‘कार्यालयातून खाली आल्यावर एक टॅक्सी मिळाली. मात्र अनेक भागांत रात्रीही पाणी भरले असल्याने मार्ग बदलत आणि कोंडीतून वाट काढत ठाण्यापर्यंतचा प्रवास करावा लागला. टॅक्सीने घरी पोहोचण्यास तीन तास लागले. लोअर परळ ते ठाणे प्रवासाला टॅक्सीच्या मीटरनुसार ९०० रुपये भाडे झाले. आमच्या कार्यालयात मध्य रेल्वेने प्रवास करणारे १५ जण अडकले होते. त्यातील काहींनी रात्र कार्यालयातच काढली. सकाळी ६ वाजता ते घरी गेले. सकाळी उशिरा घरी गेल्यामुळे अनेक कर्मचारी दुसऱ्या दिवशी कामावर आले नाहीत.’

‘लोकल सुरू होणार नाहीत याचा अंदाज येताच आम्ही रात्री ८ वाजता दुसरे पर्याय शोधण्यासाठी चार सहकाऱ्यांसह कार्यालयाबाहेर पडलो. मोनो रेल्वेने अर्धा प्रवास करण्याचे ठरवले. परंतु,  मोनो स्थानकावरील प्रवाशांची रांग रस्त्यापर्यंत आली होती. मात्र तिकीट काढण्यासाठी पोहोचेपर्यंत मोनो बंद झाल्याची घोषणा झाली. शेकडो प्रवासी पुन्हा रस्त्यावर आले. त्यातही टॅक्सी उपलब्धच नव्हत्या. आम्हाला दोन तासांनंतर कशीबशी टॅक्सी मिळाली आणि वाशी गाठले. मात्र ओला-उबरचा चालक कल्याण म्हटले की भाडे रद्द करत होते. अशा चार गाडय़ा रद्द झाल्या. शेवटी एका ओला रिक्षाला आम्ही कल्याणला सोडायला भाग पाडले. घरी पोहोचण्यास अडीच वाजले. टॅक्सी भाडय़ाला १ हजार ६०० रुपये गेले,’ असा अनुभव सुहास सरपाते या प्रवाशाने व्यक्त केला.

यवतमाळमधून मुंबईत मुलाच्या प्रवेशासाठी आलेल्या संजय पुराम यांची ही बुधवारी दुसरी मुंबई खेप होती. बुधवारी ४ तारखेला मुंबईत पोहोचायचे आणि मुलाच्या दंत वैद्यकीयचा प्रवेश रद्द करायचा. मग मुलाने दुसऱ्या दिवशी परभणीला जाऊन पशू वैद्यकीयला प्रवेश घ्यायचा, असे त्यांचे साधे गणित होते. परंतु, बुधवारी सकाळीच लागलेल्या संततधारेमुळे ते ठाण्यातच अडकले. मुंबईत तर पोचायचे, पण गाडय़ा बंद. कोणीतरी सांगितले म्हणून ठाण्याला तीन हात नाक्याहून शीवला जाणारी बस पकडली. पण पुढे कसे जायचे याची काहीच माहिती नव्हती. ते म्हणाले, ‘मुंबईत आलो की ही अशीच सगळी धावपळ पाहायला मिळते. मागच्या महिन्यात प्रवेश घ्यायला आलो होतो, तेव्हाही अशाच पावसामुळे गाडय़ा बंद पडल्या होत्या.कसातरी पोहोचलो. आता प्रवेश रद्द करायला आलो तर पुन्हा हेच!’

 सेलिब्रेटींनाही फटका

विमानतळावरही प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले. काही विमानांना सहा तासांचा उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांनी मनस्ताप व्यक्त केला. अभिनेत्री स्पृहा जोशीसह शेकडो प्रवाशांना विमानतळावरच थांबून राहावे लागले. तिने टिव्टरद्वारे इंडिगो कंपनीवर रोष व्यक्त केला. तर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी वाहन सोडून गुडघाभर पाण्यातून चालत घर गाठावे लागले.

दुसऱ्या दिवशीही रेल्वेची रखडपट्टी

  • अवघ्या सहा तासांत २१७ मिमीपर्यंत कोसळलेल्या पावसामुळे बुधवारी काही तास कोलमडलेली पश्चिम रेल्वे सायंकाळी सहाच्या सुमारास रुळावर आली असली तरी मध्य रेल्वेने मात्र प्रवाशांना चांगलेच रडवले.
  • हार्बर सेवा गुरुवारी पहाटे चार वाजता सुरू झाली. सीएसएमटी-अंधेरी गाडी सकाळी ५.२० वाजता सोडण्यात आली. त्या पाठोपाठ सीएसएमटी-पनवेल या दरम्यान सहाच्या सुमारास गाडी निघाली. त्यानंतर दिवसभर तिन्ही सेवा अर्धा तास विलंबाने धावत होत्या.
  • अनेक गाडय़ा पाण्याखाली गेल्याने त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी वेळापत्रक पाळणे रेल्वेला शक्य झाले नाही.
  • पश्चिम रेल्वेची वाहतूक संध्याकाळी रडतखडत सुरू झाली. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना रात्री उशिरा घर गाठता आले.
  • पावसाळा सुरू होण्याआधी मध्य व पश्चिम रेल्वेकडून उपनगरीय रेल्वे मार्गावर नालेसफाई, झाडांच्या फांद्यांची छाटणी, सिग्नलसह अन्य तांत्रिक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतात. दरवर्षी मस्जिद सॅण्डहर्स्ट रोड, भायखळा, सायन, कुर्ला, विद्याविहार, कांजुरमार्ग, मानखुर्द येथे मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबते. यंदाही येथे पाणी साचू नये यासाठी रुळांची उंची वाढवण्याबरोबरच नालेसफाई केल्याचा दावा केला होता. तसेच उपनगरीय मार्गावरील ७८ नाल्यांची सफाई केल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, हे सर्व दावे वाहून गेले आहेत.
  • तुतारी’चा गोंधळ

कोकणात जाणारी तुतारी एक्स्प्रेस बुधवारी रात्री सुटणे अपेक्षित होते. परंतु, दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारच्या सुमारास ही गाडी सुटली. परंतु, दादरमध्ये गाडी आली असता दरवाजे न उघडल्याने प्रवाशांचा धीर सुटला. त्यांनी सरळ रुळावर येत आपल्या संतापाला वाट करून दिली. या गोंधळामुळे दादरमध्ये लोकल वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गाडय़ांची रांग सायनपर्यंत लागली होती. त्यामुळे रेल्वेच्या गोंधळात भरच पडली.