शैलजा तिवले
संरक्षण विभाग, राज्य कामगार विमा योजना आणि शासकीय रुग्णालयांसाठी तयार केलेल्या औषधांची खुल्या बाजारात आणि ऑनलाइन अवैध विक्री करणाऱ्या २८ औषध पुरवठादारांचा परवाना अन्न व औषध विभागाने रद्द केला. मुंबई, पुणे, रायगड आणि नाशिकच्या पुरवठादाराचा यात समावेश आहे. खुल्या बाजारात आढळलेल्या औषधांच्या इतर बॅचेसचीही बेकायदा विक्री होत आहे का, याची तपासणी पोलीस आणि प्रशासनाकडून केली जात आहे.
भायखळा येथील निवान फार्मास्युटिकल्सकडे विविध शासकीय विभागांसाठी तयार केलेली औषधे विक्रीस असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता शाखेस मिळाली होती. त्यानुसार ३१ जानेवारीला प्रशासनाने छापा टाकून गॅलव्हास, आक्र्यालिऑन, लँटस सोलो स्टार इंजेक्शन इत्यादी औषधांचा १३ लाख रुपयांचा माल जप्त केला. ही औषधे खास संरक्षण विभाग, राज्य कामगार विमा योजना आणि शासकीय रुग्णालयांसाठी तयार करण्यात येतात. याचदिवशी रायगड येथील मेडलाईफ इंटरप्रायझेस या ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या पुरवठादाराकडून १७ लाखांची औषधे जप्त करण्यात आली होती. निवान फार्मास्युटिकल्सने पुरवठा केलेल्या सेफ लाईफ एंटरप्रायझेस (मुलुंड) आणि सी.के.एजन्सी (डोंगरी) या ठिकाणाहूनही २ अणि ४ फेब्रुवारीला औषधे जप्त करण्यात आली होती. निवान फार्मास्युटिकल्सला सानपाडय़ाच्या समर्थ डिस्ट्रिब्युटर्सने औषध पुरवठा केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.
या तपासामध्ये विविध ठिकाणी घातलेल्या छाप्यांमधून ४० लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. या औषधांवर ‘फॉर डिफेन्स ओन्ली’, ‘नॉट फॉर सेल’ इत्यादी लेबल होते. हे लेबल अस्पष्ट करून पुरवठादार विक्री करत होते. या प्रकरणी मुलुंड, नवी मुंबई, भायखळा आणि पुण्यातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
या सर्व पुरवठादारांची चौकशी करून यांचे परवाने प्रशासनाने रद्द केले आहेत. भायखळा, काळाचौकी, भांडुप, दहिसर, डोंगरी, मरिन लाइन्स, विक्रोळी, अंधेरी, माहीम, प्रिन्सेस रस्ता, लोअर परेल या विभागातील २० पुरवठादारांचे परवाने रद्द झाले आहेत. पुण्यातील कोथरुड, सदाशिव पेठ, वानवाडी भागातील पाच पुरवठादार, रायगडमधील दोन आणि नाशिकच्या एका पुरवठादाराचा परवाना रद्द झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिली.