महिनाभरात तीन ‘सीएनजी’ बस जळून खाक झाल्याने ‘बेस्ट’ने अशा ४०० बस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. अंधेरी
रेल्वे स्थानक परिसरातील आगरकर चौक येथे बुधवारी सीएनजी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर ‘बेस्ट’ने हे पाऊल उचलले. मे. मातेश्वरी कंपनीद्वारे चालविण्यात येणाऱ्या टाटा कंपनीच्या ‘सीएनजी’वर चालणाऱ्या दोन बसगाडय़ांना आग लागण्याच्या घटना आधीच घडल्या होत्या. बुधवारीही त्याची पुनरावृत्ती झाली. बेस्ट बस क्रमांक ४१५ अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील आगरकर चौक येथे आली तेव्हा ती प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती. शेवटचा थांबा असल्याने सर्व प्रवासी उतरल्यानंतर ६.५५ च्या सुमारास बसने अचानक पेट घेतला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. २० ते २५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, तोपर्यंत बस आगीत खाक झाली. आगीमुळे अंधेरी स्थानकाकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.

वेळापत्रकावर परिणाम?
बसमध्ये आवश्यक बदल आणि योग्य उपाययोजना करेपर्यंत ४०० बसगाडय़ा बंद ठेवण्याचा निर्णय ‘बेस्ट’ने घेतला. त्यामुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस प्रवासाचे नियोजन करताना प्रवाशांनी ४०० बस बंद असल्याचे लक्षात घ्यावे, असे आवाहन ‘बेस्ट’ने केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधीच्या दुर्घटना..
‘सीएनजी’वरील बसला आग लागण्याच्या घटना २५ जानेवारी आणि ११ फेब्रुवारी रोजी घडल्या होत्या. बुधवारी बसला आग लागण्याची तिसरी घटना घडली.