मुंबई : लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरीत करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून ४१०.३० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. याविषयीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थींना आळा बसावा यासाठी या योजनेत ईकेवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. बहुतांश लाडक्या बहिणींनी ई केवायसी पूर्ण केले असल्याचे महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. ई केवायसीसाठी १८ सप्टेंबरपासून दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असून १८ नोव्हेंबरपर्यंत ई केवायसी पूर्ण करावी असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले.
अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आढावा घेतला. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा थेट हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत असून, अनेक लाभार्थी भगिनींच्या जीवनात या योजनेमुळे आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे. आतापर्यंत काही महिन्यांचे हप्ते सरकारकडून नियमितपणे वितरित करण्यात आले आहेत.
मात्र, लाभार्थी महिलांची माहिती अधिक अचूक आणि पारदर्शकपणे पडताळली जावी, यासाठी महिला व बालविकास विभागाने आता ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. या प्रक्रियेतून प्रत्येक लाभार्थीची ओळख आणि पात्रता आधार क्रमांकाद्वारे सत्यापित केली जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. १८ सप्टेंबर २०२५ पासून ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत तटकरे यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तटकरे यांनी केले.
