मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत सुरू असलेल्या रस्ते कामांचा फटका रस्त्यांलगतच्या झाडांना बसू लागला आहे. शेकडो झाडांच्या मुळांना धक्का बसल्याने ही समस्या आणखी तीव्र झाली आहे. नुकतेच प्रभादेवी येथे ५० ते ६० झाडांच्या मुळांना रस्ते कामादरम्यान धक्का लागल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित कंत्राटदाराला ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. कामादरम्यान योग्य खबरदारी घेण्यात न आल्याने ३५ ते ४५ वर्षे जुन्या झाडांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नुकसान झालेल्या झाडांमध्ये सोनमोहरी, गुलमोहर, जांभूळ, वड, पिंपळ, भेंडी, अशोकाचा समावेश आहे.

खड्डेमुक्त मुंबईचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महानगरपालिकेने रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच, विहित मुदतीत ही कामे पूर्ण व्हावीत, यासाठी काँक्रिटीकरणाच्या कामांना वेग देण्यात आला आहे. मात्र, काम जलद गतीने पूर्ण करताना अनेकदा रस्त्यालगतच्या झाडांची योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे हजारो झाडांचे नुकसान होत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. रस्ते खोदकाम करताना योग्य खबरदारी घेतली नसल्याने अनेक ठिकाणच्या झाडांना धक्का लागला आहे. प्रभादेवी येथे जिवा आत्माराम राऊळ मार्ग, जुना प्रभादेवी मार्ग, वीर स्नातजी लेन, फेमस स्टुडिओ लेन या ठिकाणी महापालिकेतर्फे रस्ते काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत.

या कामादरम्यान रस्त्यांवरील अनेक झाडांचे नुकसान झाले आहे. हरित लवादाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार झाडांच्या १ मीटर परिघात खोदकाम करण्यास मनाई आहे. मात्र, कंत्राटदाराने या नियमाला बगल देत रस्त्यालगतच्या झाडांच्या मुळांशी काँक्रीटीकरण केल्यामुळे जवळपास ३५ ते ४५ झाडांच्या मुलांना धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी झाडांची मुळे कापली गेली आहेत, तर अनेक ठिकाणी ती उघडी पडली आहेत. परिणामी, पावसाळयात झाडे उन्मळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यात सोनमोहरी, गुलमोहर, जांभूळ, वड, पिंपळ, भेंडी, अशोकाच्या झाडांचा समावेश आहे. ही झाडे जवळपास ३५ ते ४५ वर्षे जुनी असल्यामुळे त्यांना हानी पोहोचणे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे. काँक्रीटीकरणादरम्यान झाडांचे नुकसान झाल्याची बाब निदर्शनास येताच संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान विभागाने याबाबत पालिकेच्या रस्ते विभागाला माहिती दिली. तसेच कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्याची सूचना दिली. त्यानुसार रस्ते विभागाने संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावून ५० हजार रुपये दंड ठोठावला. नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रभादेवी येथे झाडांचे नुकसान झाल्यामुळे कंत्राटदाराला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३७८ प्रकरणात कंत्राटदारांना नोटीस

रस्त्यांच्या काँक्रीटीकरणादरम्यान झाडांचे नुकसान केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी ३७८ प्रकरणात कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यात २४१३ झाडांच्या मुळांना धक्का लागल्याचे निदर्शनास आले होते. रस्त्याची कामे सुरू असतानाच अनेक ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याची कामे केली जात आहेत. त्यावेळी रस्ता खोदताना झाडांचे नुकसान झाल्यामुळे संबंधित विभागाला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. रस्ते कामादरम्यान झाड उन्मळून पडण्याच्या ७ प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.