एकाच पत्त्यावर पाच महाविद्यालयांना परवानगी; अडीच महिन्यांनंतरही अधिकाऱ्यांवर कारवाई नाही

एकाच पत्त्यावर महाविद्यालयांना परवानगी देण्याचा मुंबई विद्यापीठाचा ‘उद्योग’ उघडकीस आल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी या प्रकरणी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर विद्यापीठाच्या सेवाशर्तीनुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. हे आदेश प्राप्त होऊन अडीच महिने उलटले तरी कुलगुरू डॉ. संजय देशमुख अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. याबाबत कुलगुरूंशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही.

मुंब्रा येथील हबीब शिक्षण संस्थेने एकाच जागेचा पत्ता देत पाच महाविद्यालयांची परवानगी मागितली होती. त्यानुसार विद्यापीठाने योग्य ती प्रक्रिया करून महाविद्यालयांना परवानगीही दिली. मात्र प्रत्यक्षात ही सर्व महाविद्यालये एकाच जागेवर आहेत ही बाब विद्यापीठाशी संबंधित कोणत्याही विभागाला लक्षात आले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नवीन महाविद्यालयाचा प्रस्ताव हा सर्व प्रथम विद्यापीठ आणि महाविद्यालये विकास महामंडळाकडे येतो. यानंतर संलग्नता विभागामार्फत त्यांची पडताळणी होते. या दोन स्तरावरच महाविद्यालयाच्या अर्जातील ही बाब लक्षात येणे अपेक्षित होते, असे शासनाने नेमलेल्या समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालाचा आधार घेत कुंटे यांनी १२ ऑगस्ट रोजी विद्यापीठाला पत्र लिहून या प्रकरणात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर विद्यापीठाच्या सेवाशर्तीनुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर जबाबदार तज्ज्ञ समितीतील सदस्यांची मान्यता काढून घेणे, समितीच्या सदस्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणे, त्यांची विभागीय चौकशी सुरू करणे असे आदेश दिले आहेत. हे आदेश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाच्या संलग्नता/मान्यता विभागाच्या उपकुलसचिवांनी स्थानीय चौकशी समितीच्या सदस्यांना वस्तुनिष्ठ खुलासा करण्याबाबत पत्र पाठविले. मात्र विद्यापीठातील एकाही अधिकाऱ्याकडून असा खुलासा मागविला नसल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत कुलगुरूंशी वारंवार संपर्क साधूनही योग्य ती माहिती मिळू शकली नाही. एवढेच नव्हे तर प्रधान सचिवांच्या आदेशानुसार योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याचे त्रोटक उत्तर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी लीलाधर बन्सोड यांनी कुलगुरूंच्या वतीने दिले.

विद्यापीठ आणि महाविद्यालये विकास मंडळाचे संचालक तसेच पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या का? याबाबत उत्तर देण्याचे टाळले. गंभीर बाब म्हणजे स्थानीय चौकशी समितीच्या सदस्यांना मात्र तातडीने नोटिसा बजावून खुलासा मागविण्यात आला त्याच वेळेला प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या आदेशानुसार विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

या प्रकरणात जबाबदार असलेल्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचे सुस्पष्ट आदेश मी दिलेले आहेत. याची अंमलबजावणी तातडीने करावीच लागेल. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यातील दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. विद्यापीठाकडून लवकरच याबाबतचा अहवाल अपेक्षित आहे.  – सीताराम कुंटे, प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग