लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: पावसाळ्यात रेल्वेतून प्रवास करताना बाहेरचे पाणी पिताना प्रवाशांच्या मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होतात. बाटलीबंद पाण्याने तहान भागविणे काही प्रवाशांना परवडत नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विविध रेल्वे स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग यंत्र बसवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना बाटलीबंद पाण्याच्या तुलनेत स्वस्त दरात पाणी मिळावे यासाठी कायम गर्दी असलेल्या २५ रेल्वे स्थानकांवर ५३ वॉटर व्हेडिंग यंत्रे बसवण्यात आली आहेत.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) कंत्राटी पद्धतीने उपनगरीय रेल्वे स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग यंत्रे बसविली होती. मात्र, करोनाकाळात ही यंत्रे बंद पडली. काही कारणास्तव आयआरसीटीसीने वाॅटर व्हेडिंग यंत्रांची सेवा बंद केली. तसेच सध्या उपनगरीय स्थानकांतील आयआरसीटीसी वाॅटर व्हेडिंग यंत्रे हटवत आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वस्त दरात पाणी मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, पश्चिम रेल्वेने स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग यंत्रे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा… मुंबई: आयडॉलच्या एमएमएस व एमसीए प्रवेश परीक्षांचे ऑनलाइन अर्ज आजपासून उपलब्ध

वॉटर व्हेंडिंग यंत्रांमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. या यंत्रांमुळे प्रवाशांना माफक दरात पिण्याचे पाणी विकत घेता येईल. प्रवाशांना बाटलीत पाणी पुन्हा भरण्याचा किंवा बाटलीबंद पाणी विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ही सुविधा स्थानकांवर २४ तास उपलब्ध केली आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा… मुंबई: गारेगार प्रवासाला वाढती पसंती, वातानुकूलित लोकलच्या प्रवासीसंख्येत २३ लाखांनी वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम रेल्वेने कंत्राटदार कंपनीला वॉटर व्हेडिंग यंत्रे बसविणे आणि ही सेवा पुरविण्याचे पाच वर्षांचे कंत्राट दिले आहे. पश्चिम रेल्वेला यातून वार्षिक ३२.५६ लाख रुपये महसूल आणि ५ वर्षांमध्ये १.६९ कोटी रुपये महसूल मिळेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.