मुंबई : खोकल्यामुळे त्रस्त झालेल्या ५९ वर्षीय व्यक्तीने खोकल्याचे औषध समजून कपड्यांवरील डाग काढण्यासाठी रसायन प्यायले. या प्रकारामुळे अत्यवस्थ झालेल्या त्या व्यक्तीला उपचारासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मृत व्यक्ती व्यवसायाने धोबी असून खोकल्याच्या जून्या औषधाच्या बाटलीत त्याने कपड्यांवरील डाग काढण्याचे औषध ठेवले होते. त्यामुळे चूकून तो औषध प्यायल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
संभाजीत सजई धोबी(५९) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचे लोअर परळ येथील दीपक टॉकीजजवळ त्याचे दुकान आहे. तेथे तो कपडे धुणे व इस्त्री करण्याचे काम करायचा. गेल्या काही दिवसांपासून त्याला खोकला झाला होता. अखेर बुधवारी रात्री तो खोकल्याचे औषध प्यायला. त्यानंतर गुरूवारी सकाळी त्याच्या पोटात मळमळू लागले. पोटात दुखत असताना त्याने रक्ताची उलटी केली. त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला तातडीने परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत त्याला वीषबाधेसारखा प्रकार झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले व त्याच्यावर उपचाराला सुरूवात केली. पण संभाजीतची प्रकृती खालावली. तो बेशुद्ध झाला. त्यानंतर गुरूवारी दुपारनंतर त्याचा मृत्यू झाला. मृत्यू अनैसर्गिक असल्यामुळे तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार स्थानिक ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी रुग्णालयात येऊन परिचीत व्यक्तींकडून माहिती घेतली असता त्याने खोकल्याचे औषध समजून चुकून घातक रसायन प्यायल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी औषधाची बाटली पोलिसांनी जप्त केली असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. या मृत्यू प्रकरणी आम्ही अपमृत्यूची नोंद केली असून तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनशिवे यांनी सांगितले.
ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी याप्रकरणी काही व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत. त्यात संभाजीतला जुन्या औषधांच्या व इतर वस्तूंच्या बाटल्यांमध्ये कपडे धुण्याचे रसायन, कपड्यांचे रंग ठेवण्याची सवय होती. तसेच खोकल्याच्या औषधाच्या बाटलीतही त्याने कड्यांवरील कठीण डाग काढण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन ठेवले होते. पण बुधवारी तो ही बाब विसरला व त्याने चुकून ते औषध पिऊन झोपला. त्यावेळी पहाटे त्याची प्रकृती खालावली व त्याला रक्ताची उलटी झाली, असे अधिकाऱ्याने सांगितले.