मुंबई : मुंबईत ‘बीए.४’चा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ रुग्णांची संख्या ६४ झाली. राज्यात रविवारी २ हजार ९६२ नवे करोना रुग्ण आढळले, तर ३ हजार ९१८ जण करोनामुक्त झाले. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनुकीय अहवालामध्ये मुंबईतील ६० वर्षांच्या  महिलेला ‘बीए.४’ची बाधा झाल्याचे आढळले. ही महिला १६ जूनला करोनाबाधित झाली होती. तिचे लसीकरण पूर्ण झाले असून सौम्य स्वरूपाची लक्षणे होती. घरगुती विलगीकरणात ती पूर्ण बरी झाली. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. यापैकी पुण्यात १५, मुंबईत ३४, नागपूर, ठाणे आणि पालघर येथे प्रत्येकी चार, तर रायगड मध्ये तीन रुग्ण आढळले. 

राज्यात रविवारी मृतांची संख्या काही अंशी वाढली असून सहा मृत्यू नोंदले. त्यापैकी तीन मृत्यू मुंबईत, तर पुणे आणि ठाणे महापालिका विभागात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली.  राज्यात २२ हजार ४८५ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत ७६१ नवे करोना रुग्ण, तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील गेल्या महिन्यात दैनंदिन करोना रुग्णसंख्या दीड ते दोन हजारांपर्यंत गेली होती. आता ती कमी होत असून रविवारी ७६१ नवीन रुग्णांची नोंद झाली. सध्या साडेसात हजारांपर्यंत रुग्ण उपचाराधीन आहेत. मात्र रविवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी आढळलेल्या नवीन रुग्णांपैकी ९५ टक्के जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. दिवसभरात १,६९७ रुग्ण करोनामुक्त झाले. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली असून सध्या ७ हजार ६७१ रुग्ण उपचाराधीन आहेत. एकूण बाधितांची संख्या ११ लाख १५ हजारांवर गेली आहे. रुग्णदुपटीचा कालावधी वाढू लागला असून ५८४ दिवसांवर आला आहे. दरम्यान, मृत्यू झालेले तीनही पुरुष होते. त्यांना मधुमेह, किडनी, रक्तदाब असे दीर्घकालीन आजार होते.

ठाणे जिल्ह्यात ४७२ नवे करोनाबाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी ४७२ नवे करोना रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी ठाणे १८३, नवी मुंबई १६५, कल्याण – डोंबिवली ४६, मीरा – भाईंदर ३९, ठाणे ग्रामीण १७, उल्हासनगर १३, बदलापूर पाच आणि भिवंडी पालिका क्षेत्रात चार रुग्ण आढळून आले. तर, कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात ४ हजार ७२४  सक्रिय रुग्ण आहेत.