मंगल हनवते

मुंबई : संपूर्ण राज्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला असून अपघातात प्राण गमावणाऱ्यांची गेल्या सहा -सात महिन्यांतील संख्या भयावह आहे. गेल्या सहा महिन्यांत पाच हजार ८९७ प्राणांतिक अपघात होऊन त्यांत सहा हजार ४३७ जणांचा मृत्यू झाला, तर मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर डिसेंबर २०२२ ते ३ जुलै या सात महिन्यांतील ५१ प्राणांतिक अपघातांत १०६ जणांचा बळी गेला. 

राज्यात २०१९ ते मे २०२३ या कालावधीत एक लाख ३५ हजार १०३ रस्ते अपघात झाले. त्यापैकी ५५ हजार ६९ प्राणांतिक अपघात होते. त्यांत ५९ हजार ५४६ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यातील २०२३ मधील प्राणांतिक अपघातांच्या तुलनेत समृद्धी महामार्गावरील प्राणांतिक अपघातांचे प्रमाण केवळ ०.८५ टक्के असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केला आहे.

गेल्या आठवडय़ात समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथील सिंदखेडराजा परिसरात खासगी बसला भीषण अपघात झाला. त्यात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या महामार्गावरील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा अपघात होता. या अपघातामुळे वाढत्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघातानंतर राज्यभरातील रस्ते अपघातांची आकडेवारी उघड झाली आहे. या आकडेवारीनुसार, राज्यात २०१९ ते मे २०२३ या कालावधीत एक लाख ३५ हजार १०३ रस्ते अपघात झाले असून त्यांत  ५९,५४६ जणांचा मृत्यू झाला.

समृद्धीवरून आतापर्यंत (डिसेंबर २०२२ ते ७ जुलैपर्यंत) ३० लाख १२ हजार ९९५ वाहने धावली. यादरम्यान समृद्धीवर ५१ प्राणांतिक अपघात झाले. त्यांत १०६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात जानेवारी ते मे २०२३ दरम्यान ५ हजार ८९७ प्राणांतिक अपघात झाले असून यात ६,४३७ जणांचा मृत्यू झाला. ही संख्या पाहता समृद्धीवरील अपघातांचा दर केवळ ०.८५ टक्के आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग प्रवासाच्या दृष्टीने पूर्णत: सुरक्षित असून वाहनचालक, प्रवाशांनी नियमांचे पालन करण्याची आणि शिस्त पाळण्याची आवश्यकता आहे, असे ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी सांगितले.

अन्य वाहनांच्या जवळून वाहन चालविणे – ९ – १३

वेगमर्यादेचे उल्लंघन – ६ – ९

आग                         – १ – २५

धडक             – २ – ४

इतर                         – ५ – ५

एकूण – ५१ – मृत्यू १०६

वर्ष अपघात संख्या

२०१९   ३२,९२५

२०२०   २४,९७१

२०२१   २९,४७७

२०२२   ३३,३८३

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२३   १४,३४७ जाने. ते मे

सद्यस्थिती..

’साडेचार वर्षांतील एक लाख ३५ हजार १०३ अपघातांपैकी ५५ हजार ६९ प्राणांतिक.

’या अपघांतात ५९,५४६ जणांचा मृत्यू, तर छोटय़ा-मोठय़ा अपघातांत ७७,३९३ जण गंभीर.