मुंबईः आर्थिक गैरव्यवहारात अडकल्याची भीती दाखवून बोरिवलीमधील वृद्ध महिलेची ७८ लाख ७० हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

६७ वर्षांची तक्रारदार महिला बोरिवलीतील गोराई परिसरात राहते. त्या एचपीसीएल या शासकीय तेल कंपनीतून २०१८ साली निवृत्त झाल्या. त्यांना ९ ऑक्टोंबरला अजयकुमार नावाच्या एका व्यक्तीने दूरध्वनी करुन मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदार महिलेविरोधात न्यायालयाचे अटक वॉरंट जारी केला असून कुठल्याही क्षणी अटकेची कारवाई होईल, असे त्याने सांगितले. यावेळी त्यांनी आपल्याविरोधातील खटल्याची विचारणा केली. बंगळुरू पोलिसांनी त्यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला असून त्याबाबत हा वॉरंट जारी करण्यात आल्याचे त्याने सांगितले. त्यांच्या आधारकार्डसह इतर दस्तावेजाच्या आधारे बँकेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे. ही रक्कम आर्थिक गैरव्यवहारातील असून त्यांच्यासह इतराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, असे सांगून त्याने दूरध्वनी संबंधित पोलीस अधिकार्‍याला दिला. त्यानंतर विनयकुमार चौबे असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने नंतर तिच्याशी संभाषण सुरू केले. आपण बंगळुरू पोलीस दलात कामाला असल्याचे त्याने सांगितले. यावेळी तक्रारदार महिलेने या संपूर्ण प्रकरणाशी तिचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्याने त्यांना स्काईप अप्स डाऊनलोड करण्यास सांगून चौकशी सुरू केली होती. एका व्यक्तीचे छायाचित्र पाठवून त्याला आर्थिक गैरव्यवहारात अटक झाली आहे. त्याच्याकडे काही क्रेडिट कार्ड सापडली होती. त्यात एक कार्ड तक्रारदार महिलेच्या नावावर असल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा – वरळी येथील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : आरोपी मिहीर शहाला मानवी जीवनाची अजिबात पर्वा नाही, उच्च न्यायालयाची टिप्पणी

हेही वाचा – फडणवीस पुन्हा येणार? भाजप श्रेष्ठींचा निर्णय मान्य;शिंदे ,महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदार महिलेच्या नावाने उघडण्यात आलेल्या बँक खात्यात दोन कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले होते. त्यामुळे तिला चौकशीसाठी बंगळुरूला यावे लागेल असेही त्याने सांगितले. त्यानंतर तिला दिपाली मासिलकर या महिला अधिकार्‍याने संपर्क साधला. तिने संपूर्ण कुटुंबियांवर कारवाईची धमकी दिली. त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल आणि याच गुन्ह्यांत शिक्षा होणार असल्याची भीती दाखविली. त्यानंतर तिने तिच्या बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिला चौकशीच्या नावाखाली काही रक्कम बँक खात्यात जमा करण्यास प्रवृत्त करण्यात आले. चौकशीनंतर तिच्या खात्यात ही रक्कम पुन्हा हस्तांतरित केली जाईल, असेही सांगण्यात आले. महिला अधिकाऱ्यावर विश्‍वास ठेवून तिने विविध बँक खात्यात सुमारे ७८ लाख रुपये हस्तांतरित केले. घडलेला प्रकार तक्रारदार महिलेने आपल्या मुलाला सांगितला. मुलाने फसवणूक झाल्याचे सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रक्कम हस्तांतरित झालेल्या बँक खात्यांमार्फत पोलीस तपास करीत आहेत.