मुंबई : मालाड येथे मुंबई महापालिकेच्यावतीने प्राण्यासाठी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. पाळीव व भटके श्वान, गुरे-ढोरे, प्राणी व पक्षी यांच्यावर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्याच्या हेतुने महानगरपालिकेतर्फे येथे १०० रुग्णशय्येचे पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी भूमिपूजन करण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि श्रीमद राजचंद्र जीवदया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक-खासगी तत्त्वावर या पशुवैद्यकीय रुग्णालयाची निर्मिती होणार असून पुढील दोन वर्षांत हे रुग्णालय कार्यान्वित होईल.
मुंबईत प्राण्यांवर उपचार करण्यासाठी परळ येथे एकमेव प्राण्यांचे रुग्णालय आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईत भटक्या आणि पाळीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्राण्यांमधील आजारांचे प्रमाणही वाढले आहे. त्याचबरोबर प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या आजारांचेही प्रमाण वाढले आहे. मात्र मुंबईतील खार येथे पालिकेचा फक्त एकच दवाखाना आहे. तर सुमारे २०० खाजगी दवाखाने आहेत.
उच्चभ्रू कुटुंबाना आपल्याकडील पाळीव कुत्र्यांना, प्राण्यांना खाजगी दवाखान्याचे दर परवडतात. मात्र गरीब कुटुंबाना आपल्या पाळीव प्राण्यांवर उपचार करणे परवडत नाही. तसेच मोकाट, भटक्या जनावरांना आपले आजार अंगावरच काढावे लागतात. त्यामुळे पालिकेने स्वत:चे पशुरुग्णालय सुरू करण्याचे ठरवले होते. प्राणी कल्याणाच्या उद्देशाने हे अत्याधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यात येत आहे.
याबाबत पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले की, मालाड येथे एकूण २ हजार २४० चौरस मीटर क्षेत्रफळ जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये पशुंवर उपचारासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण १०० रुग्णशय्या, अत्याधुनिक रोग निदानासाठी क्ष-किरण (एक्स-रे), एमआरआय; अत्याधुनिक शस्त्रक्रिया व अतिदक्षता विभाग; लहान प्राण्यांसाठी विशेष उपचार सुविधा यांचा समावेश असेल.
कोंडवाडाअंतर्गत पकडण्यात आलेल्या भटक्या जनावरांचे संगोपन आणि त्यांची देखभाल येथे करण्यात येईल आणि त्यांच्यावर उपचारांसाठी सुविधा उपलब्ध असतील. तसेच लहान प्राण्यांच्या मृतदेहासाठी दहनभट्टीही या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे, असेही पठाण यांनी सांगितले.