मुंबई: प्रेयसीचा विनयंभग केल्यामुळे संतापलेल्या प्रियकराने मालाड येथील एका गुंडाची हत्या केल्याचे उघडकीस आले. फहीम सय्यद उर्फ फहीम मचमच (४२) असे हत्या करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. भायखळा पोलिसांनी याप्रकरणी प्रियकरासह दोघांना अटक केली आहे. मात्र अद्याप फहीमचा मृतदेह सापडलेला नाही.

आरोपींनी मालाडच्या एका नाल्यात मृतदेह फेकला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.मालाडच्या मालवणी येथे फहीम नजीर सय्यद उर्फ फहीम मचमच (४२) राहात होता. फहीम अभिलेखावरील सराईत गुन्हेगार होता. तो १७ एप्रिलपासून बेपत्ता होता. याप्रकरण फहीमची पत्नी रिदा सय्यद हिने २१ एप्रिल रोजी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, भायखळा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी फहीमची हत्या केल्याची कबुली दिली. फहीमची हत्या करून त्याचा मृतदेह एका गोणीत भरला आणि मालाडच्या मार्वे रोड येथील नाल्यात टाकल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. सध्या फहीमच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे, अशी माहिती भायखळा पोलिसांनी दिली.

प्रेयसीची छेड काढल्याने हत्या

याबाबत माहिती देताना मालवाणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी फहीम रात्री त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याचा मित्र झोपला होता. मित्राची १६ वर्षांची मुलगी घरात एकटी होती. ती संधी पाहून फहीमने तिचा विनयभंग केला. मुलीने हा प्रकार आपल्या प्रियकराला सांगितला. प्रियकराने मित्र, तसेच पीडित मुलीच्या भावासोबत फहीमच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला आणि त्याची हत्या केली. यानंतर मृतदेह गोणीत भरून नाल्यात टाकून दिला. शुक्रवार संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आम्ही ताब्यात घेतेलल्या आरोपींची चौकशी करीत आहोत, तसेच मृतदेहाचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगरकर यांनी सांगितले. या हत्या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का, हत्या नेकमी कशी केली ते चौकशीनंतर समोर येईल, असेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी एक हत्या

प्रेयसीची छेड काढल्याने प्रियकराने हत्या केल्याची अशीच एक घटना नायगावमध्ये मार्च २०२५ मध्ये घडली होती. नायगावमध्ये राहणारे किशोर मिश्रा (७५) बेपत्ता होते. उत्तन येथे त्यांचा मृतदेह सापडला होता. यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले होते. मिश्रा यांनी त्यांच्या दुकानात काम करणार्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्या रागातून मुलीच्या अल्पवयीन प्रियकराने मिश्रा यांची डोक्यात दगड घालून हत्या केली होती.