मुंबई: गंभीर गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यासाठी विक्रोळी न्यायालयात बनावट जामीनदार हजर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या तिघांविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार टिळक नगर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी चेंबूरच्या टिळक नगर पोलिसांनी आरोपी साजिद खानविरोधात (२१) गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. हा आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून काही दिवसांपूर्वी त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यासाठी त्याला दोन जामीनदार हवे होते. नलावडे नावाच्या एका इसमाने आरोपीला दोन जामीनदार देण्यासाठी काही पैसे घेतले. त्यांना ३० एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांनी जामिनासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शिधावाटप पत्रिका आदी कागदपत्रे जमा केली होती.
मात्र पडताळणीमध्ये दोघांची कागदपत्रे बनावट असल्याचे न्यायालयाच्या लक्ष्यात आले. न्यायालयाने तत्काळ दोघांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्याचबरोबर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले. त्यानुसार टिळकनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांचे खरे नाव अजय राव आणि अजिनाथ पगारे असल्याचे उघडकीस आले. मात्र जामीनदार होण्यासाठी त्यांनी जयप्रकाश गौड आणि रवी गवळी या नावांची बनावट कागदपत्रे तयार केली होती.
ही कागदपत्रे नलावडे नावाच्या इसमाने तयार करून दिल्याचे त्यांनी चौकशीत पोलिसांना सांगितले. तसेच यासाठी आपल्याला दोन हजार रुपये दिल्याची माहिती त्यांनी पोलीसांना दिली. त्यानुसार टिळक नगर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करून विक्रोळी पोलिसांच्या स्वाधीन केले.तसेच याप्रकरणी नलावडेचा पोलीस शोध घेत आहेत.