मुंबई : वरळी येथील प्रसिद्ध सासमिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन ॲण्ड टेक्स्टाइल संस्थेच्या महाविद्यालयातील प्रयोगशाळेत भाजून दोन महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर चौकशीअंती वरळी पोलिसांनी गुरुवारी प्रयोगशाळा प्रभारी असलेल्या महिलेविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला.

वरळी येथील प्रसिद्ध सासमिरा महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत ग्लिसरीन डाईंग मशीनमधून गरम ग्लिसरीन बाहेर उडाले होते. त्यामुळे श्रद्धा शिंदे (२७) व प्रतीक्षा घुमे (२२) या दोघी गंभीर भाजल्या होत्या. १६ नोव्हेंबर, २०२२ रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणानंतर जखमींना उपचारासाठी ऐरोली येथील बर्न रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू झाल्यामुळे प्रयोगशाळा प्रभारी लीना म्हात्रे यांच्याविरोधात गुरुवारी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – मुंबई : नवरात्रोत्सवातील पुजेहून परतणाऱ्या महिलेचे दागिने पळवले, कस्तुरबा पोलिसात गुन्हा दाखल

हेही वाचा – मुंबई : धूळ व प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना न केल्यास खासगी, शासकीय बांधकामे रोखणार, आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा इशारा

सुरक्षा उपकरणे उपलब्ध असूनही ती परिधान न करता कर्मचारी प्रयोगशाळेत गेले होते. प्रभारी म्हणून सुरक्षेची पाहणी करण्याची जबाबदारी म्हात्रे यांच्यावर होती. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार करून गुन्हा दाखल करून घेतला आहे.