मुंबईतील एका मोठया बांधकाम व्यावसायिकाला कुख्यात गुंडाने पैशांसाठी धमकावल्याचा प्रकार उघडीस आला आहे. या घटनेनंतर व्यवसायिकाने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गणेश शिंदे असे खंडणी मागणाऱ्या गुंडाचे नाव असून पोलिसांनी गणेशसह त्याच्या साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
वांद्रे येथील प्रसिद्ध रुग्णालयात उपचार घेत असताना आरोपी गुंडाने त्यांच्या खोलीत प्रवेश करून पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाविरोधातही बँक गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागात(सीबीआय) गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.
गणेश शिंदे व त्याच्या साथीदाराविरोधात याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखाही याप्रकरणी समांतर तपास करत आहे. तक्रारीनुसार, बांधकाम व्यावसायिक रुग्णालयाच्या ११ व्या मजल्यावरील खोलीत उपचार घेत होता. आरोपी गणेश शिंदे व त्याचा साथीदार रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास व्यावसायिकाच्या रुग्णालयातील खोलीत परवानगीशिवाय आले व त्यांनी तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाला धमकावण्यास सुरूवात केली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खार पालीहिल परिसरात राहणारा तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाविरोधात ३४ हजार कोटींच्या बँक गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल आहे. दुसरीकडे आरोपी शिंदे याला शीव परिसरात गोळीबार केल्याप्रकरणी २०११ मध्ये अटक झाली होती.
