मालाडमधील २७ वर्षीय तरूणीला इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या युनाटेड किंगडममधील मित्राने लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने वाढदिवसाला भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक केली. याप्रकरणी कुरार पोलीस अधिक तपास करत आहेत. मालाड येथे राहणाऱ्या तक्रारदार तरूणीच्या वडिलांचा व्यवसाय आहे. इन्स्टाग्रामवरून तक्रारदार तरूणीची युकेमधील एका व्यक्तीशी ओळख झाली. जेम्स बाँड नावाच्या प्रोफाईलवरील व्यक्तीशी ती मेसेंजर आणि व्हॉट्सॲपवर चॅट करत होती. तो यूकेमधील एक व्यावसायिक असल्याचे त्याने सांगितले. नंतर एके दिवशी बाँडने तक्रारदार तरूणीला तिचा वाढदिवस विचारून घेतला. काही दिवसांनी त्याने तक्रारदार तरूणीच्या पत्त्यावर सोन्याचे दागिने, कपडे इत्यादी महागड्या भेटवस्तू पाठवल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर दिल्ली विमानतळावरील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विभागातील अधिकारी असल्याचे सांगून नेहा नावाच्या व्यक्तीचा तक्रारदार तरूणीला दूरध्वनी आला. तिने परदेशातून भेटवस्तू आली असून ती मिळवण्यासाठी २५ हजार रुपये कर भरणे आवश्यक असल्याचे तक्रारदाराला सांगितले. त्यानुसार तक्रारदार तरूणीने नेहाने सांगितलेल्या बँक खात्यात रक्कम जमा केली. त्यानंतर भेटवस्तूमध्ये परदेशी चलन असल्यामुळे दंड भरावा लागेल, असे सांगितले. तक्रारदार तरूणीने दंडाचे २६ हजार रुपये भरले. पुढे दहशतवादविरोधी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शुल्क, कर अशा वेगवेगळ्या कारणांसाठी मागितलेली रक्कमेपोटी तक्रारदाराने विविध बँक खात्यांमध्ये पाच लाख सहा हजार रुपये जमा केले. त्यानंतरही आणखी पैशांची मागणी केल्यानंतर तक्रारदार तरूणीला संशय आला.

अखेर तिने बुधवारी याप्रकरणी कुरार पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपींच्या बँक व्यवहारांबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. परदेशी व्यक्तीच्या नावाने नायजेरियन टोळीने तरूणीची फसवणूक केल्याचा संशय असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A citizen of uk who was introduced on instagram made a scam of lakhs mumbai print news amy
First published on: 11-08-2022 at 21:11 IST