सात झोपड्या आगीत खाक, १३ जण जखमी
मुंबई : मालाड पूर्व येथील आप्पापाडा परिसरात सोमवारी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत सात झोपड्या भस्मसात झाल्या, तर १३ जण जखमी झाले. या आगीत पाच कुत्रे मृत्युमुखी पडले. गेल्या चार महिन्यांतील आप्पापाडा येथील ही आगीची तिसरी घटना आहे.आप्पापाडा परिसरात सोमवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास आग लागली. या आगीत सात झोपड्या जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत १३ जण जखमी झाले असून एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीत पाच कुत्र्यांचा मृत्यू झाला.
मालाड पूर्व येथील आप्पापाडा परिसरातील गेल्या चार महिन्यामधील आगीची ही तिसरी घटना आहे. मार्च महिन्यात आनंद नगर, आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली होती. त्यात दीड – दोन हजार झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर अनेकांचे संसार उघड्यावर आले. या दुर्घटनेपूर्वी महिनाभर आधी जामऋषी नगरमध्ये आग लागली होती. त्यावेळी १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. दाट लोकसंख्येच्या या परिसरात आगीसारखी दुर्घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो.
हेही वाचा >>>मुंबई-पुण्याची घरांच्या विक्रीत देशभरात आघाडी
त्यामुळे दुर्घटनेचे गांभीर्य वाढते. या परिसरात घरोघरी लघुउद्योगाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे आग लागण्याचा धोकाही अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन या परिसरात एक जलद प्रतिसाद वाहन तैनात करावे, तेथे लघु अग्निशमन केंद्र उपलब्ध करावे, अशी मागणी या परिसरातील माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केली होती. मिश्रा यांनी याप्रकरणी पी – उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवले होते. दिंडोशी मतदारसंघात गोरेगाव ते मालाड पूर्व भगात एकच अग्निशमन केंद्र आहे. त्यामुळे या परिसरात आग लागल्यास अग्निशमन दलाची वाहने पोहोचण्यास विलंब होतो, असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. तसेच शारदाबाई पवार उद्यानात जलद प्रतिसाद वाहन तैनात करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
पी उत्तर विभाग कार्यालयाने जलद प्रतिसाद वाहन तैनात करण्यासाठी या जागेला अनुमती दर्शवली असून या जागेची व्यवहार्यता तपासण्यासाठी अग्निशमन दलाला पत्र पाठवले आहे. त्यामुळे येत्या काळात आप्पापाडावासियांना कोणत्याही दुर्घटनेत लगेचच मदत मिळू शकेल व मोठी दुर्घटना टळू शकेल.