मुंबई : अनेकदा एखाद्या कलाकृतीचा प्रभाव रसिक प्रेक्षकांवर खोलवर पडत असतो. नाटक, मालिका असो किंवा चित्रपटातील विविध पात्रे जवळची वाटू लागतात, अनेक प्रसंग खरेखुरे वाटतात आणि आपण कथानकात गुंतत जातो. कलाकार आणि चाहत्यांमधील प्रेमाची प्रचितीही वेळोवेळी येते. याचप्रकारे सन मराठी वाहिनीवरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत मुख्य नायिका असणाऱ्या मंजूला गोळी लागल्याचा प्रसंग पाहून ८४ वर्षांच्या दत्तू कर्णे प्रचंड अस्वस्थ झाले आणि ते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी गावातून थेट साताऱ्यात पोहोचल्याचे समोर आले आहे.
दत्तू कर्णे यांनी सोलापुरातून थेट साताऱ्यातील पोलीस ठाण्यात जाऊन ‘मंजू कशी आहे? ती बरी आहे ना?’ असे पोलीस अधिकाऱ्यांना विचारले. त्यांच्या चेहऱ्यावरून मंजूबद्दलची काळजी, प्रेम आणि आपुलकीच्या तीव्र भावना स्पष्ट जाणवत होत्या. साताऱ्यातील पोलीस उपनिरीक्षक अशोक सावंजी आणि कॉन्स्टेबल अनिल सावंत यांनी आजोबांच्या भावना समजून घेत, त्यांना ‘कॉन्स्टेबल मंजू’च्या सेटवर नेण्याची विशेष व्यवस्था केली. त्यानंतर सेटवर पोहोचताच आजोबांनी ‘मंजू’ म्हणजेच अभिनेत्री मोनिका राठी हिच्या तब्येतीची विचारपूस केली. अभिनेता वैभव कदम म्हणजेच मालिकेतील ‘सत्या’ला आईच्या चुकांची जाणीव करून देत थेट सुनावले आणि इतर कलाकारांनाही खरीखुरी पात्रं समजून स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली मते मांडली. हा भावूक क्षण पाहून सेटवरील कलाकारांसह तंत्रज्ञांच्या डोळ्यात पाणी आले.
दत्तू कर्णे हे कुटुंबियांना न सांगता निघून गेल्यामुळे त्यांचे कुटुंब काळजीत होते. पोलिसांनी कर्णे यांच्या कुटुंबियांना ते साताऱ्यामध्ये असल्याचे कळविले. तर मालिकेच्या चमूने त्यांची दखल घेतली, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना सुखरूप घरी पाठवले. ही हृदयस्पर्शी घटना अनुभवून ‘मंजू’ म्हणजेच अभिनेत्री मोनिका राठी म्हणाली की, ‘मंजू या पात्राला मिळणारे प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही. मला गोळी लागली म्हणून ८४ वर्षांचे आजोबा थेट सेटवर आले, हा क्षण आमच्यासाठी धक्कादायक आणि अतिशय भावूक होता. समाजमाध्यमांवर प्रेक्षक नेहमी प्रतिक्रिया देत असतात, पण प्रत्यक्ष कोणी तरी, तेही एवढ्या वयात, एवढा लांबचा प्रवास करून, केवळ मालिकेतील पात्राच्या काळजीपोटी पोहोचतो ही फारच मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांचे हे निखळ प्रेम सन मराठी व कॉन्स्टेबल मंजूच्या संपूर्ण चमूसाठी खऱ्या अर्थाने सर्वात मोठा पुरस्कार आहे’.
‘मी गेल्या वर्षभरापासून ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका पाहत आहे. या मालिकेत मंजूला गोळी लागल्यानंतर नेमके पुढे काय झाले? हे दोन ते तीन दिवस कळलेच नाही. त्यामुळे हे माहीत करून घेण्यासाठी थेट साताऱ्याची वाट धरली आणि पोलीस ठाण्यात पोहोचलो. मात्र त्या ठिकाणी मंजू दिसली नाही, पोलिसांनी माझी विचारपूस केली आणि माझ्या नातवाशीही फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी मला मंजू आणि इतर कलाकारांची भेट घडवून आणली. तेव्हा मला प्रचंड आनंद झाला. त्यानंतर मला सुखरूप बस स्टॅण्डवर सोडण्यात आले आणि मी सोलापूरला घरी आलो’, असे दत्तू कर्णे यांनी सांगितले.