मुंबई : बीडीडी पुनर्विकासाअंतर्गत ५०० ऐवजी ७०० चौरस फुटांचे घर मिळावे, २५ हजार रुपयांऐवजी ३५ हजार रुपये घरभाडे मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी बीडीडीमधील रहिवाशांनी मोर्चाची हाक दिली आहे. बीडीडीतील जंबोरी मैदानातून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगल्यावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव या तीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुनर्विकासाअंतर्गत बीडीडीवासियांना ५०० चौरस फुटांची घरे मोफत देण्यात येणार आहेत. त्यानुसार तिन्ही ठिकाणी पुनर्वसित इमारतींची कामे सुरू असून यात ५०० चौ फुटांची घरे बांधण्यात येत आहेत. असे असताना आता अचानक काही रहिवाशांनी ७०० चौरस फुटांच्या घरांची मागणी केली आहे. म्हाडाकडून बीडीडीतील रहिवाशांना दरमहा २५ हजार रुपये घरभाडे देण्यात येत आहे.

हेही वाचा >>>विरोधकांच्या बैठकीला शह देण्याचा प्रयत्न; महायुतीकडून गुरुवार, शुक्रवारी बैठक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र आता रहिवाशांनी ३५ हजार रुपये घरभाड्याची मागणी केली आहे. या मागण्यांसह करारपत्रातील त्रुटी दूर करावी, कायमस्वरूपी देखभाल खर्च द्यावा, प्रत्येक घरामागे एक पार्किंग द्यावे आदी विविध मागण्या रहिवाशांनी केल्या आहेत. या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आज बीडीडीवासियांनी मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने बीडीडीमधील रहिवासी सहभागी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.