लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : एसटीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्यांना त्याबाबत थेट आगार प्रमुखांकडे तक्रार करता येणार आहे. त्यानंतर तक्रारीचे तातडीने निराकरण होईल, अशा पद्धतीची यंत्रणा एसटी प्रशासनाकडून उभी करण्यात आली आहे.एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगारातील आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, तसेच तेथील स्थानक प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक लिहिण्यात आला आहे.

एसटी प्रवासात चालक अतिवेगाने गाडी चालवत असेल,  चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असेल, वाहक उद्धटपणे बोलला किंवा वाहकाने योग्य ठिकाणी उतरवले नाही अशा अनेक तक्रारी प्रवाशांच्या असतात. मात्र तक्रार नेमकी कुठे करावी, हा त्यांच्या समोरचा प्रश्न असतो. यापूर्वी एसटी बसमध्ये संबंधित आगाराचा व स्थानकाचा क्रमांक प्रसिद्ध केलेला असायचा, परंतु काही काळाने हे नंबर दिसेनासे  झाले.

हेही वाचा >>>मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे एसटीच्या प्रवासात काही समस्या अथवा अडचण आल्यास त्यासाठी दाद कोणाकडे मागावी? हा एक मोठा प्रश्न प्रवाशांसमोर होता. त्यामुळे प्रवाशांच्या सुचनेनुसार एसटी महामंडळाने आता ज्या आगाराची बस आहे, त्या आगार प्रमुखांचा नंबर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून प्रवासादरम्यान प्रवाशांना अडचण अथवा समस्या निर्माण झाली तर त्या समस्येचे किंवा तक्रारीचे निराकरण तातडीने व्हावे, हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे  प्रवासादरम्यान त्यांना एखादी अडचण आल्यास थेट तिथे प्रदर्शित केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून  अडचणीत अथवा समस्येचे  निवारण तातडीने करावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.