मुंबई: खेळताखेळता एका १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेमध्ये तीक्ष्ण धातूचा तुकडा (हँडबॅगच्या चेनचा स्टॉपर) अडकल्याने त्याला परळ येथील वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालरोग ईएनटी तज्ज्ञ डॉ. बालगोपाल कुरूप यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने बाळावर एसोफॅगोस्कोपी (अन्ननलिकेची एंडोस्कोपी) करून त्याच्या अन्ननलिकेत अडकलेला धातूचा तुकडा बाहेर काढला.

मुंबईत राहणाऱ्या रोहित यादव (नाव बदलले आहे) यांच्या बाळाला अचानक तीव्र खोकला सुरू होऊन तो चिडचिड करू लागला. त्यामुळे त्यांनी बाळाला बालरोग तज्ज्ञांकडे नेले. दोन आठवडे उपचार केल्यानंतरही बाळाला जेवताना खोकला येऊन त्याची चिडचिड प्रचंड वाढली. त्यामुळे डॉक्टरांनी क्ष किरण काढल्यानंतर त्याच्या अन्ननलिकेमध्ये धातूची वस्तू अडकल्याचे आढळून आले. घाबरलेल्या पालकांनी बाळाला त्वरित वाडिया रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयामध्ये केलेल्या तपासणीमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांजवळील अन्ननलिकेच्या मध्यभागी धातूची टोकदार वस्तू अडकल्याचे दिसत होते. त्यामुळे त्याचा श्वासनलिकेवर दाब पडत होता. मुलाने ती वस्तू कधी आणि कशी गिळली याबाबत पालकांना काहीच माहिती नव्हती.

मुलाला सामान्य भूल देऊन एसोफॅगोस्कोपी करण्यात आली. ही प्रक्रिया सुमारे एक तास चालली. ब्रोन्कोस्कोपी (श्वास नलिकेची एंडोस्कोपी) श्वास नलिकेमध्ये दाब दिसून आला. एसोफॅगोस्कोपीमध्ये अन्ननलिकेच्या मध्यभागी एक तीक्ष्ण धार असलेल्या धातूचा तुकडा आढळला. यामुळे तेथे व्रण आणि सूज आली होती. बालरोग भूलतज्ज्ञ डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत बाळाला भूल दिली. त्यानंतर ईएनटी डॉक्टरांच्या तुकडीने अन्ननलिकेच्या डाव्या बाजूला अडकली वस्तू यशस्वीपणे काढली. शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एक्स-रे काढून खात्री करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर बाळाला लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले.

दुसऱ्या दिवशी बाळाला नळीच्या साहाय्याने जेवण देण्यात आले. बाळाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर पाच दिवसांनी त्याला घरी सोडण्यात आल्याचे वाडिया रुग्णालयातील ईएनटी आणि पेडियाट्रिक ऑटोरिनोलॅरिन्गोलॉजिस्ट डॉ. बालगोपाल कुरूप यांनी सांगितले.बाळाच्या अन्ननलिकेत तीक्ष्ण वस्तू अडकल्याचे ऐकून आम्हाला धक्काच बसला. आमचे मूल अनेक दिवसांपासून हा त्रास सहन करीत होते या विचाराने आम्ही खूप घाबरलो. वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी धातूचा तुकडा सुरक्षितपणे बाहेर काढला, असे सांगत रोहित यादव यांनी वाडिया रुग्णालयातील डॉक्टर व त्यांच्या संपूर्ण पथकाचे आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतून तीक्ष्ण धातूचा तुकडा शोधून तो यशस्वीरित्या काढून टाकण्यात आला, हे आमच्या डॉक्टरांचे मोठे यश आहे. कोणत्याही बाळाला निरोगी आयुष्य जगता यावे, प्रत्येक मूल रोगमुक्त रहावे हाच आमचा मुळ हेतू आहे, असे बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.