पूर्व द्रुतगती मार्गावरील सुमन जंगशन येथील होर्डिंगवर चढून एका तरुणाने गुरुवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी समजूत काढून या तरुणाला सुखरूप खाली उतरले. या प्रकारामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.शरद सानप (२८) असे या तरुणाचे नाव असून तो सुमन नगर परिसरातील रहिवासी आहे. गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास अचानक तो सुमन जंक्शन जवळील एका होर्डिंगवर चढला. ही बाब काही वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना महिती दिली.
हेही वाचा >>>“जे स्वत:च्या वडिलांचे विचार विसरले ते इतिहास विसरले तर नवल ते काय?” ; आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका
तात्काळ चुनाभट्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाला खाली उतरण्याची विनंती केली. मात्र त्याने खाली उतरण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी अग्निशमन दला पाचारण केले. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी समजूत काढून या तरूणाला होर्डिंगवरून खाली उतरवले.
हेही वाचा >>>मुंबई: पत्रा चाळ प्रकल्पातील कल्पतरु रेडियन्स रहिवाशांच्या मुलांचे आगळे आंदोलन!
पूर्व द्रुतगती मार्गाच्या मधोमधच साधारण तासभर हा प्रकार सुरू होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केली होती. परिणामी, या भागात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी या तरुणाला होर्डिंगवरून खाली उतरवल्यानंतर चुनाभट्टी पोलीस ठाण्यात नेले. प्रेमसंबंध असलेल्या महिलेसोबत वाद झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तरूणाने पोलिसांना चौकशीत सांगितले.