मुंबई : सध्या समाजमाध्यमांवर कोणतीही शहानिशा न करताच खोडसाळ वृत्तीने मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरविण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी कलाकारांसह त्यांच्या कुटुंबियांनाही मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
‘आदेश बांदेकर यांच्या हृदयाचे ठोके मंदावले. . . मृत्यूच्या दारात’ अशी खोटी बातमी सरार्स समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आली आहे. मात्र मी सुदृढ असून सुखरूप प्रवास करीत आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांबद्दल खोट्या बातम्या पसरविणाऱ्या वृत्तीला मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो’, असे आदेश बांदेकर यांनी म्हटले आहे. यासंदर्भात समाजमाध्यमांवर एक चित्रफित अपलोड करीत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सध्याच्या स्पर्धात्मक जगात समाजमाध्यमांवर विविध पोस्टचा महापूर आलेला पाहायला मिळतो आणि सदर पोस्टना सर्वाधिक लाईक व व्ह्यूज मिळण्यासाठी रस्सीखेच सुरू असते. मात्र ‘लाईक व व्ह्यूज’चे उच्चांक गाठण्यासाठी अनेकजण मर्यादा ओलांडतात. सध्या कोणतीही शहानिशा न करताच मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या निधनाच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. सध्या ‘आदेश बांदेकर यांच्या हृदयाचे ठोके मंदावले. . . मृत्यूच्या दारात’ अशी खोटी बातमी पसरविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात समाजमाध्यमांवर एक चित्रफित अपलोड करीत आदेश बांदेकर यांनी खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
या व्हिडिओमध्ये आदेश बांदेकर म्हणतात की, ‘नमस्कार, मी आदेश बांदेकर. सुदृढ आणि व्यवस्थित असून सुखरूप प्रवास करीत आहे. प्रेमापोटी आणि काळजीपोटी अनेकांचे फोन येत आहेत. जे संपर्क साधू शकत नाहीत, त्यांच्याकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपले खूप हितचिंतक असतात. मात्र कुणीतरी अत्यंत अतृप्त भावनेने वेगवेगळ्या बातम्या पसरविते आणि ही वृत्ती आहे, या वृत्तीला काही करू शकत नाही. आदेश बांदेकरांच्या हृदयाचे ठोके मंदावले ते निधनापर्यंत बातम्या पसरविल्या आहेत. ही वृत्ती श्रद्धांजली वाहण्यापर्यंत पोहोचलेली आहे. माझ्यापर्यंत होते तोपर्यंत ठीक होते आणि मी हसण्यावारी या वृत्तीकडे दुर्लक्ष केले.
परंतु मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांबाबतही अशाच खोट्या बातम्या पसरविण्यात आल्याचे समाजमाध्यमांवर पाहिले. कोणाचा घाटात अपघात, कुणाच्या बसला अपघात. . . थेट पोहोचविण्यापर्यंत बातम्या पसरविण्यात येत आहेत. आता या सर्वांना पोहोचविण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी ही वृत्ती नष्ट झाली पाहिजे. दुसऱ्याच्या नावाचा वापर करून स्वतःचे व्ह्यूज वाढवायचा धंदा बंद करण्यासाठी यांना समाजमाध्यमांवर जास्तीत जास्त लोकांनी रिपोर्ट केले पाहिजे. कारण ही वृत्ती अत्यंत घातक आहे आणि नकळतपणे कुटुंबातील व्यक्तीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या वृत्तीला श्रद्धांजली वाहावी, असे मला मनापासून वाटते’.
दरम्यान, मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज कलाकारांनाही निधनाच्या खोट्या बातम्यांचा सामना करावा लागला आहे. यासंदर्भातही आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त करीत खडे बोल सुनावले आहेत. ‘मराठी मनोरंजनसृष्टीतील जवळपास २५ ते ३० कलाकारांबद्दल खोट्या बातम्या पसरविणाऱ्या वृत्तीला मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. या वृत्तीवर हसावे, नाहीतर काय करावे? मी मात्र व्यवस्थित व सुदृढ आहे ’, असे आदेश बांदेकर यांनी स्पष्ट केले.