मुंबई :  गर्भवतीकडे नवऱ्याचे आधारकार्ड नसल्याने राजावाडी रुग्णालयात उपचार नाकारल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर, अनेक सामाजिक आणि रुग्णमित्र संस्था पुढे येत असून गर्भवतीकडे आधारकार्ड नसल्यास त्यांना उपचार आणि तपासणी नाकारल्याच्या तक्रारी करत आहेत. हा सूर पाहता मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने यावर स्पष्ट आदेश दिले आहेत. आधारकार्ड नसल्याच्या कारणाने गर्भवतीवर उपचार किंवा तपासणीविना परत पाठविल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिले आहेत.

 राजावाडी रुग्णालय प्रकरणात प्रामुख्याने आरोग्य जनहक्क समिती धावून आली आहे. निव्वळ आधार कार्ड किंवा तत्सम कागदपत्र नसल्यास गर्भवतीवर उपचार किंवा तपासणीच होत नसल्याच्या तक्रारी समितीकडून करण्यात येत आहेत.

नाल्याची सफाई करत असताना  गर्भवती खडय़ात पडली. तिला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्यावेळी तिच्याकडे आधारकार्ड नसल्याने तिला घरी पाठविण्यात आले. त्यापूर्वी ती शताब्दी रुग्णालयात गेली होती. तेथेही तिला उपचार नाकारला होता.

पालिकेचे आदेश ..

आधारकार्ड नसल्यास कोणत्याही गर्भवतीला आरोग्य सुविधा न देता परत पाठवू नका, असे पालिकेचे आदेश आहेत. आदेशाचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.