मुंबईतील कस्टम हाऊसजवळ शुक्रवारी शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) उमेदवार आदित्य शिरोडकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असताना शिवसेना आणि मनसेत हाणामारीचा प्रकार घडला. मात्र, या प्रकाराला शिवसैनिक जबाबदार नसून या हल्ल्यामागे मनसेचा पूर्वनियोजित कट असल्याचे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर सांगितले आहे.
शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत या कस्टम हाऊस येथे अर्ज भरायला आले असताना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या दिशेने दगडांचा आणि सोडावॉटरच्या बाटल्या फेकण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेत शिवसेनेच्या पदाधिका-यांविरोधात गुन्हे दाखल केल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कोणताही अजेंडा नसल्यामुळे त्यांचा मानसिक तोल ढळला असल्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकारची कृत्ये घडत आहेत. निवडणूक आयोगाने याप्रकाराची दखल घेत मनसेवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा आदित्य ठाकरेंनी केली. यावेळी आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत ते पुढीलप्रमाणे…