‘बेस्ट’चा परिवहन उपक्रम वाचविण्यासाठी आता मुंबईकरांना आवाहन
मुंबई : सर्वसामान्य मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरू झालेली बेस्ट सध्या अडचणीत आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचेही हाल होत आहेत. बेस्ट बंद झाली तर मध्यम आणि कनिष्ठ वर्गाला परवडणारे नाही. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेने बेस्टच्या पाठीशी उभे राहून बेस्ट वाचवावी, असे आवाहन ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ संघटनेतर्फे करण्यात आले. या संघटनेने गेल्या आठवडय़ात जनसुनावणी घेत बेस्टची स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना सुचवल्या. तसेच बेस्ट कामगारांच्या पत्नींनीही व्यथा मांडल्या.
बसची वाट पाहत तासन्तास उन्हातान्हात उभे राहावे लागणे ही समस्या प्रामुख्याने मांडण्यात आली. तसेच बस थांब्यावरील अनधिकृत पार्किंग, काही चालक-वाहकांची अरेरावी, सुट्टय़ा पैशांवरून होणारे वाद, आवश्यक त्या मार्गावर बस नसणे, वाढलेले भाडे अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.
बंद झालेले जुने मार्ग पुन्हा सुरूकरावेत अशी मागणीही त्यांनी केली. बेस्टची तूट पालिकेने भरून काढावी आणि बेस्टकडे जास्तीचे पैसे आल्यास ते पालिकेला द्यावेत अशी तरतूद महापालिकेच्या अधिनियमात आहे.
मात्र पालिका बेस्टची जबाबदारी घ्यायला तयार नाही अशी खंत बेस्ट कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. महापालिकेच्या अर्थसंकल्पात सागरी किनारा मार्गासाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद आहे, मग बेस्ट चालवण्यासाठी पालिकेकडे पैसे का नाहीत, असा प्रश्न संघटनेतर्फे उपस्थित करण्यात आला.
पालिकेच्या बेस्ट समितीमध्ये व्यावसायिक आणि परिवहनतज्ज्ञ असणे आवश्यक आहे. मात्र ही समिती सध्या राजकीय नेत्यांच्या हातात असल्याने बेस्टच्या खासगीकरणाचा डाव रचला जात आहे. असे झाल्यास बेस्ट सर्वसामान्यांची राहणार नाही. त्यामुळे जनतेने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊन पालिकेवर दबाव आणावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
प्रवाशांनी सुचवलेले उपाय
* खासगी वाहन खरेदी वेळी ‘सार्वजनिक वाहतूक कर’ लावावा. त्यातून जमा झालेला पैसा बेस्टकडे वळवावा.
* बस थांब्यांवर बसचे वेळापत्रक आणि मार्गिकांची यादी लावावी.
* ६ पदरी रस्त्यांमध्ये १ मार्गिका बेस्टसाठी राखीव असावी, जेणेकरून बस वाहतूूक कोंडीत अडकून उशिरा पोहोचणार नाही.
* ४ पदरी रस्त्यांमधील १ मार्गिका गर्दीच्या वेळी बेस्टसाठी राखीव ठेवावी. महिलांसाठी विशेष बस चालवाव्यात.
* बस थांब्यांची स्थिती सुधारावी.
* प्रत्येक घरामागे एक वाहन असा कायदा करून खासगी वाहनांवर नियंत्रण आणावे.
नोकरीची खात्री तर नाहीच, पण सध्या होणारा पगारही अनियमित आहे. पगार कमी असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी कर्जही मिळत नाही. शिवाय कर्मचाऱ्यांना वरिष्ठांचा दबावही सहन करावा लागतो, असा अनुभव बेस्ट कर्मचाऱ्याची पत्नी असलेल्या सुनीता पवार यांनी सांगितला.