मुंबई : भारतीय चित्रपट जगाच्या कानाकोपऱ्यात सहज आणि स्वस्तात पोहोचविण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने ‘आमिर खान टॉकीज – जनता का थिएटर’ची घोषणा केली आहे. या माध्यमातून प्रेक्षकांना यूट्यूबवर ‘पे पर व्ह्यू’ तत्वावर स्वस्त दरात चित्रपट पाहता येणार आहेत. विशेष बाब म्हणजे आमिर खान प्रोडक्शन्स निर्मित ‘सितारे जमीन पर’ हा हिंदी चित्रपट १ ऑगस्टपासून ‘आमिर खान टॉकीज – जनता का थिएटर’ या यूट्यूब वाहिनीवर ‘पे पर व्ह्यू’ तत्वावर अवघ्या १०० रुपयात पाहता येणार आहे.
‘भारतातील एकूण लोकसंख्येपैकी २.५ ते ३ टक्के म्हणजेच सुमारे तीन ते साडेतीन कोटी प्रेक्षक प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहतात. घराजवळ चित्रपटगृह नसल्यामुळे अनेकांना आवडीचे चित्रपट पाहायला मिळत नाहीत. काळानुसार डिजिटल क्षेत्रात प्रचंड बदल झाले आहेत. तसेच भारतात ‘यूपीआय’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करीत आहेत. दरदिवशी सुमारे ५५ कोटी भारतीय यूट्यूबचा वापर करीत आहेत. त्यामुळे यूट्यूबसारख्या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून ‘आमिर खान टॉकीज – जनता का थिएटर’द्वारे भारतातील प्रत्येक घर, गाव व प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘पे पर व्ह्यू’ तत्वावर घरबसल्या, तसेच कोणत्याही ठिकाणी स्वस्त दरात चित्रपट पाहता येतील’, असे आमिर खान याने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच ओटीटीचे मॉडेल न आवडल्यामुळे चित्रपटाचे हक्क कोणत्याही ओटीटी माध्यमाला विकले नाहीत, असेही आमिर खान म्हणाला.
‘आमिर खान टॉकीज – जनता का थिएटर’ ही युट्यूब वहिनी एप्रिल २०२५ महिन्यात सुरू करण्यात आली. या वाहिनीवर सुरुवातीला आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित व आमिर खान प्रोडक्शन्स निर्मित ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचे विविध व्हिडिओज अपलोड करण्यात आले. या व्हीडिओजना ३५० दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आता या युट्यूब वाहिनीवर चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून भारतीय चित्रपट प्रत्येक प्रेक्षकापर्यंत आणि जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात पोहोचवता येईल, असा विश्वास यूट्यूब इंडियाच्या कंट्री मॅनेजर डायरेक्टर गुंजन सोनी यांनी व्यक्त केला.
‘आमिर खान टॉकीज – जनता का थिएटर’ची वैशिष्ट्ये
‘आमिर खान टॉकीज – जनता का थिएटर’ हे यूट्यूब वाहिनीच्या स्वरूपात भारतासह जगभरातील ३८ देशांमध्ये सबटायलसह उपलब्ध असेल. या ठिकाणी प्रामुख्याने ‘पे पर व्ह्यू’ या तत्वावर आमिर खान प्रोडक्शन्स निर्मित जुने व नवे चित्रपट पाहता येतील. हे चित्रपट चित्रपटगृहानंतर युट्यूब वाहिनीवर येणार आहेत. संबंधित देशातील चलनानुसार ‘पे पर व्ह्यू’ या तत्वावर पैसे देण्याची सुविधा असेल. तसेच काही कलाकृती ‘व्हिडिओ ऑन डिमांड’ या तत्त्वावर पाहता येतील. विशेष बाब म्हणजे काही चित्रपट व ‘सत्यमेव जयते’सारखे कार्यक्रम मोफतही पाहता येणार आहेत. तसेच अनेकदा युवा निर्माते व दिग्दर्शकांना स्वतःचे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृह, ओटीटीसारखी माध्यम मिळत नाहीत. युवा निर्माते व दिग्दर्शकांच्या कलाकृती पाहून सदर चित्रपट ‘आमिर खान टॉकीज – जनता का थिएटर’ हे यूट्यूब वाहिनीवर प्रदर्शित करण्यात येतील, असे आमिर खान यांनी स्पष्ट केले.