मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा – भाईंदर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या आवश्यक त्या जमिनीचे संपादन वेगाने करावे, तसेच शासकीय जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक त्या विविध परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पाच्या मार्गरेषेने सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्राबाहेरील (NON CRZ) भागामध्ये प्रत्यक्षात कामे सुरू करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.

वर्सोवा – दहिसर हा सागरी किनारा मार्ग मुंबई महापालिकेतर्फे उभारला जात आहे. हा मार्ग पुढे दहिसर भाईंदर उन्नत मार्गालाही जोडला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट येथून थेट दहिसर, भाईंदरपर्यंत जाता येणार आहे.

वर्सोवा – भाईंदर प्रकल्पाअंतर्गत कांदळवन वळतीकरण प्रस्तावास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय (MoEF & CC) यांच्याकडून नुकतीच तत्वतः मान्यता (In-Principle Stage – 1Approval) प्राप्त झाली आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच प्रकल्प स्थळास प्रत्यक्ष भेट देऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. सुटे भाग निर्मितीसाठी (कास्टींग यार्ड) जमिनीची उपलब्धता, बांधकाम, कार्यस्थळाकडे जाणारे पोहोच रस्ते यांची पाहणी करण्यात आली. पूल विभागाचे अधिकारी व प्रकल्प सल्लागार यावेळी उपस्थित होते.

या भागातून जाणार मार्ग…

पश्चिम उपनगरातील मालाड मरिना एन्क्लेव्ह, चारकोप येथील सेक्टर ८, गोराई क्षेपणभूमी, गोराई खाडी परिसर, एक्सर मेट्रो स्थानक परिसर, कांदळपाडा मेट्रो स्थानक परिसर, दहिसर (पश्चिम) येथील आनंद पार्क या ठिकाणांचा समावेश आहे.

सध्या प्रकल्पाची पूर्वतयारीची विविध कामे सुरू आहेत. त्यात भूगर्भ मातीचे सर्वेक्षण, प्रकल्प प्रगतीपथावर असताना पर्यावरण, कामाच्या गुणवत्ता बाबतची आखणी, वाहतूक व्यवस्थापन, प्रकल्पामध्ये वापरण्यात येणारे साहित्य व विविध यंत्रसामग्री यांची जमवाजमव, प्रकल्पाचे संकल्पचित्रे व आराखडे बनवण्याचे व ते अंतिम करण्याचे काम प्रगतीपथावर आहेत. या सर्व कार्यवाहीचा आढावा देखील बांगर यांनी घेतला.

प्रकल्पांतर्गत माईंडस्पेस मालाड ते चारकोप खाडीदरम्यान उत्तर दिशा आणि दक्षिण दिशेने जाणाऱ्या बोगद्याची बांधणी केली जाणार आहे. या अंतर्गत चारकोप येथे खाचकाम स्थळ (Shaft location) आहे. कार्यस्थळाचे पोहोच रस्ते, बोगदा खणन संयंत्र (TBM), तसेच कट अँड कव्हर भागांची जुळवणी (Alignment) याच ठिकाणी केली जाणार आहे. तसेच, बोरसापाडा येथे रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येणार आहे.

चारकोप, गोराई, कांदरपाडा, दहिसर आंतर मार्गिका (Interchange) यांचे आराखडे (Design), वाहनांची प्रस्तावित गती, अस्तित्त्वातील रस्त्यांची जोडणी याबाबत सविस्तर चर्चा व पडताळणी करण्यात आली. मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मार्गरेषा भूसंपादन, मिठागर जमिनींची उपलब्धता इत्यादींबाबत प्रगतीचा आढावा घेण्यात आला. पॅकेज बीअंतर्गत सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्राबाहेरील (NON CRZ) भागामध्ये यापूर्वीच काम सुरू करण्यात आले आहे.