मुंबई: मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड अबू सालेम याने केवळ १९ वर्षे तुरुंगवास भोगला आहे, त्याचा २५ वर्षांचा कारावास अद्याप पूर्ण झालेला नाही, असे राज्य सरकारच्यावतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले. तसेच, सालेमची शिक्षा माफ करण्याचा आणि मुदतपूर्व सुटका करण्याचा प्रस्ताव प्रलंबित असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीच्यावेळी गृह विभागाचे सहसचिव सुग्रीव धापटे यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून त्याद्वारे उपरोक्त माहिती देण्यात आली. सालेमचे नोव्हेंबर २००५ मध्ये पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करण्यात आले आणि २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्याने भोगलेल्या एकूण प्रत्यक्ष शिक्षेचा कालावधी हा १९ वर्षे, तीन महिने आणि २० दिवस आहे, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र तुरुंग नियमावलीतील तरतुदींनुसार सालेम याच्या मुदतपूर्व सुटकेचा प्रस्ताव सल्लागार मंडळ आणि कनिष्ठ न्यायालयाच्या मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि तुरुंग महानिरीक्षक सुहास वारके यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली.
सालेम याच्या गुन्हेगारीचा इतिहास हा अजिबात स्वीकारार्ह नाही. भारतात अनेक गुन्हे केल्यानंतर तो परदेशात पळून गेल्याचेही वारके यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले. तसेच, सालेम याला दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सालेम याने मार्च २०२५ पर्यंत १९ वर्षे तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे, तो दावा करत असलेला २५ वर्षांच्या कारावासाचा कालावधी अद्याप पूर्ण झालेला नाही. त्याचप्रमाणे, सालेम याची कारावासातील २५ वर्षे पूर्ण होण्याची अंतिम तारीख राज्य सरकारच्या गृह विभागाकडून त्याच्या मुदतपूर्व सुटकेबाबत निर्णय घेतल्यानंतरच ठरवली जाईल, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
सालेमचा दावा
दहशतवादी कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत (टाडा) स्थापन विशेष न्यायालयाने १० डिसेंबर २०२४ रोजी सालेमचा मुदतपूर्व सुटकेचा अर्ज फेटाळून लावला होता. या निर्णयाला सालेम याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. एकूण शिक्षा, कच्चा कैदी म्हणून घालवलेला कालावधी आणि शिक्षेत मिळालेल्या माफीचा समावेश हा कार्यकाळ २५ वर्षांपेक्षा जास्त असल्याचा दावा सालेम याने याचिकेद्वारे केला आहे. त्याच्या याचिकेनुसार, २४ डिसेंबर २०२४ पर्यंत, त्याने दोन प्रकरणांमध्ये शिक्षेची बेरीज करून एकूण २५ वर्षांहून अधिक तुरुंगवास भोगला. त्यात त्याने, नोव्हेंबर २००५ ते सप्टेंबर २०१७ पर्यंतच्या कालावधीत ११ वर्षे, ९ महिने आणि २६ दिवसांची गणना केली आहे.
फेब्रुवारी २०१५ ते डिसेंबर २०२४ दरम्यान २००६ च्या टाडा प्रकरणात दोषी म्हणून घालवलेल्या ९ वर्षे, १० महिने आणि ४ दिवसांचाही २५ वर्षांच्या शिक्षेत समावेश केला आहे. तसेच, २००६ च्या प्रकरणात चांगल्या वर्तनासाठी त्याला ३ वर्षे १६ दिवसांची तुरुंगवासात शिफा माफी मिळाली होती. पोर्तुगालमधील अटकेत घालवलेल्या वेळेसाठी सर्वोच्च न्यायालयाने आणखी १ महिन्याची सूट दिल्याचेही सालेम याने यातिकेत म्हटले आहे. त्याचप्रमाणे, उपरोक्त कालावधीची बेरीज केल्यास २०२४ च्या अखेरीस, त्याने एकूण २४ वर्षे ९ महिन्यांहून अधिक काळ तुरुंगवास भोगल्याचा दावा केला आहे.