मुंबई : नवीन जलजोडणीचे काम करून दिल्याबद्दल लाच स्वीकारल्याप्रकरणी पाणी पुरवठा विभागातील सहा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कुर्ला येथील एका जलजोडणीधारकाकडून पैसे घेतानाची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमावर फिरत होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन फिटर व पाच कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असल्फा घाटकोपर परिसरात हिमालया सोसायटी मार्गावर असलेल्या गोविंद नगर चाळीत नवीन जलजोडणीसाठी कार्यादेश देण्यात आला होता. जलजोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर फिटर असलेल्या व्यक्तीने काम पूर्ण झाल्याचा अभिप्राय जलजोडणी धारकाच्या निकटवर्तीयांकडून घेतला व त्यांच्याकडून त्यांच्याकडून पैसे घेतले. या घटनेची ध्वनिचित्र फित समाज माध्यमांवर टाकण्यात आली होती.

हेही वाचा >>> ठाणे-बोरिवली प्रवास केवळ २० मिनिटांत, भूमीगत मार्गाच्या बांधकामासाठी निविदा जारी; पावसाळ्यात कामाला सुरुवात

विशेष म्हणजे ही ध्वनिचित्र फित पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी ही फित संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पाठवली. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे कुर्ला एल विभागातील जलकामे खात्यातील साहाय्यक अभियंत्यांनी सहा कामगारांना नोटीस बजावली आहे. जलजोडणीसाठी लाच घेणे हे महापालिका नियमांच्या विरोधात आहे. याप्रकरणी आपल्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा तीन दिवसात करावा असे या नोटिशीत म्हटले आहे. खुलाश्यामुळे समाधान न झाल्यास शिस्तभंगाची व प्राथमिक चौकशीची कारवाई करण्यात येईल असा इशारा या नोटिशीत देण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accepted bribes for new water connections notice to six workers municipal water department mumbai print news ysh
First published on: 16-01-2023 at 11:35 IST